नांदेड – नांदेड जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. साबणे हे यापुर्वी शिवसेनेकडून तीनवेळा निवडून आले होते. 2019 मध्ये ते या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब अंतापूरकर यांच्याकडून पराभूत झाले होते. अंतापूरकर यांच्या निधनामुळं ही जागा रिक्त झाली आहे. येत्या 30 ऑक्टोबरला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असून, काँग्रेस पक्षाने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.
दरम्यान, साबणे यांचा भाजपमधील प्रवेश शिवसेनेला धक्का असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेत अस्वस्थता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सुभाष साबणे यांच्यावर टीका करत, रडणाऱ्यांना, पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही, या शब्दांत खडे बोल सुनावले आहेत.
महाविकास आघाडी नसताना युतीचे उमेदवार म्हणून साबणे यांनी शिवसेनेकडून या ठिकाणाहून निवडणूक लढवली होती. अंतापूरकर यांच्या निधनानंतर साबणे यांनी या जागेवर दावा केला होता. शिवसेनेने या जागेसाठी आग्रह धरला नाही. आपल्याला संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याचे दिसताच साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेच्या अस्वस्थतेबाबत बोलायचं झाल्यास साबणे यांच्या पाठीशी त्या ठिकाणी मोठा वर्ग आहे. शिवाय साबणे यांनी शिवसेना सोडताना केलेले गंभीर आरोप ही राज्यभरातील तमाम शिवसैनिकांची भावना असल्याची चर्चा आहे. या शिवाय या निवडणुकीत तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये समन्वय दिसून आला नाही तर महाविकास आघाडीला पराभव देखील स्वीकारावा लागू शकतो अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- योगी सरकारच्या भ्याड कृत्याचा निषेध, दडपशाहीने लोकांचा आवाज दाबता येणार नाही – जोशी
- कोरोनामुळे अनाथ झालेल्या ३०६ बालकांच्या खात्यात सुमारे १५ कोटी ३० लाख रुपये जमा
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- ‘या’ नियमांचे पालन करणाऱ्या भाविकांनाच तुळजाभवानी मंदिरात प्रवेश दिला जाणार
- ‘रिक्त पदे भरण्याबाबत राज्य शासनाचे ‘तारीख पे तारीख’ धोरण उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुळावर येत आहे’


