पुणे : २०१९ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मिळून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. यामुळे सर्वाधिक जागा मिळवून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. शिवसेना आणि भाजपची सुमारे अडीच दशकांची मैत्री तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये कमालीचा दुरावा निर्माण झाला आहे.
गेल्या वर्षभरात भाजपने शिवसेनेसह महाविकास आघाडीवर सातत्याने घणाघात केल्याचं दिसून आलं आहे. तर, महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आता, अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठीच्या निधी संकलन अभियानावरून शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
‘रामाच्या नावाने काही लोक घरोघरी पैसे मागण्यासाठी जात आहेत. पण आपल्याला तसं करायचं नाही. बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. “देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो”,’ असा घणाघात उद्धव ठाकरेंनी आज शिवसेनेच्या बैठकीवेळी केला आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेनेची रामाशी निष्ठा राहिलेली नाही. सत्तेसाठी शिवसेनेनं ज्या पक्षांशी युती केली तेव्हाच त्यांनी हिदुत्व गहाण टाकलेलं आहे. ज्या काँग्रेसने रामाच्या अस्तित्वावरच संशय घेतला त्या पक्षाशी त्यांनी युती केली आहे. तर, शरद पवार यांनी देखील राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार नाही असं विधान केलं होतं. त्यामुळे सत्तेसाठी शिवसेना सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या इशाऱ्यावर नाचत आहे,’ असं चोख प्रत्युत्तर प्रदीप गावडे यांनी दिलं आहे.
‘शिवसेनेनं आपलं हिंदुत्व याआधीच सोडलं आहे. त्यामुळे त्यांच्या या टीकेबाबत आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. करोडो हिंदूंच्या सहभागातून भव्य राम मंदिर उभं राहणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्याची चिंता करू नये,’ असा टोला देखील प्रदीप गावडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, राहुल गांधींनी दलित मुलीशी लग्न केले तर…
- लॉकडाऊन बाबत उद्धव ठाकरेंनी केलं मोठं विधान, तर कंटेनमेंट झोनबाबत देखील दिले आदेश !
- संजय राठोडांनी राजीनामा दिला ही माहिती चुकीची; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
- भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास
- आगामी निवडणुकांबाबत महाविकास आघाडीचं ठरण्याआधीच भाजप-रिपाइंचं ठरलं ?


