मुंबई: पंतप्रधान मोदीसह त्यांचे अर्धे मंत्रिमंडळ नेहमीप्रमाणेच विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग झाले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुका जिंकून भाजपचा झेंडा फडकवायचा यासाठी मोदी व त्यांच्या कॅबिनेटने शर्थ चालवली आहे. पण याच काळात पूर्व लडाखजवळील गलवान व्हॅलीत लाल चिनी घुसले असून नववर्षदिनी चिन्यांनी त्यांचा राष्ट्रध्वज गलवान खोऱ्यात फडकवून भारताच्या सार्वभौमत्वास आव्हान दिले आहे. चीन सरकारने भारताच्या हद्दीत फक्त त्यांचा झेंडाच फडकविला असे नाही, तर या ध्वजारोहण सोहळ्याचे संपूर्ण चित्रीकरण करून तो व्हिडीओ अधिकृतपणे प्रसारित केला आहे. पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारातील प्रमुख लोकांनी चिन्यांच्या या घुसखोरीवर साधे शाब्दिक आक्रमणही केले नाही. असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून केला आहे.
५ मे २०२० रोजी याच व्हॅलीत आपल्या सैनिकांची चिन्यांबरोबर रक्तरंजित झटापट झाली होती. त्यात आमचे वीसेक सैनिक शहीद झाले. गलवान व्हॅली भारतीय सैनिकांच्या रक्ताने भिजली. त्या सर्व शहीद सैनिकांच्या शौर्याचा सन्मान भारत सरकारने केला, पण वर्षभरातच चिनी सैनिक त्याच प्रदेशात आक्रमण करून घुसले व देशाच्या राजधानीत साधी सळसळही झाली नाही.चीनची घुसखोरी लडाखच्या गलवान व्हॅलीपुरतीच मर्यादित नाही. अरुणाचल, उत्तराखंड, सिक्कीम प्रांतातही चीन घुसखोरी करीत आहे. अरुणाचल प्रदेशातील १५ ठिकाणांची नावे चीनच्या नकाशावर परस्पर बदलून चिन्यांनी आपली कळ काढली आहे, पण पाकडय़ांची कळ जेवढी जोरात लागते तेवढी चिन्यांची लागत नाही. याचे कारण असे की, पाकिस्तानशी संघर्ष केला की भारतात निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुसलमान असा झगडा पेटवता येतो.
पाकिस्तान हा एक कमजोर, तितकाच विस्कळीत देश आहे. त्यामुळे पाकडय़ांना दम भरणे, डोळे वटारणे, एखादा सर्जिकल स्टाईक करून शौर्य गाजविण्याचा आव आणणे सोपे असते. चीनच्या बाबतीत ते सोपे नाही. चीन ही एक स्वयंभू महासत्ता आहे. रशिया, अमेरिकेपेक्षा ती चार पावले पुढे आहे. आशिया खंडातील अनेक राष्ट्रे चीनने आर्थिक व लष्करी बळाने गिळली आहेत. त्यामुळे चीनने कितीही घुसखोरी केली तरी लालभाईच्या बाबतीत भारत संयम आणि सबुरीनेच घेणार आहे.चीनने आपल्या वीस सैनिकांचे बळी घेतले तरी उद्या पुन्हा एकदा चीनचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादेत येऊन आमच्या पंतप्रधानांबरोबर झोपाळय़ावर झुलताना व फाफडा, ढोकळा खाताना दिसतील; कारण चीन हे एक सामर्थ्य आहे. असा टोला संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून लगावला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- गलवानमध्ये लाल चिन्यांचा झेंडा उतरवून तिरंगा कधी फडकविणार? ‘शिवसेने’चा सवाल
- …तर मुंबईत लॉकडाऊन करावाच लागेल- इकबाल चहल
- उन्मेष पाटील यांच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले,’हे तर चिल्लर…’
- प्रवीण दरेकरांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, चित्रा वाघ यांचा टोला
- अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रियाला कोरोनाची लागण

