मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलंय. गेल्या वर्षी मार्च महिन्यातच कोरोनाचा प्रसार सुरु झाला होता. यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं. अनेकांना कोरोना संसर्गामुळे प्राण देखील गमवावा लागल्याने सामाजिक भान राखून कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सर्व सण-उत्सव साधेपणाने साजरे केले जावे असं आवाहन करण्यात आलं होतं.
दरम्यान, जनजीवन सुरळीत झाल्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोनाच सावट वाढल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केलं जात आहे. कोकणात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव प्रमाणात साजरा केला जातो. चाकरमानी या उत्सवांसाठी आपापल्या गावी परतत असतात. गावोगावी नवं चैतन्य निर्माण होत असतं. मात्र, यंदा या शिमगोत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. गावातील देव पालखीने वाजत गाजत घरोघरी नेले जातात. यानंतर, ही पालखी नाचवली जाते. मात्र, यंदा कोरोनाच सावट असल्याने पालखी घरोघरी नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
होळीसाठी मार्गदर्शक सूचना –
१)कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता २८ मार्च रोजी होळी/शिमगा हा सण कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करावा.
२)शिमगोत्सवात खास करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल यासाठी स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्या. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन होईल यासाठी दक्षता घ्यावी.
३)होळीत २९ मार्च रोजी धूलिवंदन तर २ एप्रिल रोजी रंगपंचमी साजरी केली जाणार आहे. यावेळी एकमेकांवर रंग टाकला जातो, पाणी टाकले जाते तसेच गुलाल लावून रंगांची उधळण केली जाते. हे सणही साधेपणाने साजरे करण्यात यावेत. त्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जनजागृती करावी.
४)होळी व धूलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत.
५)सरकारच्या या मार्गदर्शक सूचनांपेक्षा कडक निर्बंध स्थानिक प्रशासनाने लादले असतील तर ते लागू राहतील. शिवाय या परिपत्रकानंतरही कडक निर्बंध लादता येतील. या मार्गदर्शक सूचना मात्र यापेक्षा शिथील केल्या जाणार नाहीत.
६)कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे विविध विभाग तसेच स्थानिक प्रशासन वा पोलीस प्रशासनाने जे नियम लागू केले आहेत त्यांचेही काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘५ एप्रिलपर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही तर गनिमी काव्याने धमाका करू’
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- भारत बंद : शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी पटोले काँग्रेस नेते-मंत्र्यांसह करणार उपोषण
- तिकीट तपासणीसाची नोकरी लावून देतो म्हणत तिघांची १६ लाखांची फसवणूक

