🕒 1 min read
मुंबई : विधान परिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नियुक्त करण्यास राज्यपालांनी नकार दिल्याने निर्माण झालेल्या तिढय़ावर अखेर निवडणूक आयोगाने मार्ग काढला आणि २१ मे रोजी विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने मुदतीत आमदार होण्याचा ठाकरे यांचा मार्ग मोकळा झाला.
महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी परवानगी दिली. करोनासंदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करून ही निवडणूक होत आहे.विधान परिषदेच्या नऊ जागा २४ एप्रिल रोजी रिक्त झाल्या होत्या. करोनाच्या आपत्तीमुळे राज्यसभा तसेच विधान परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला विधान परिषदेची निवडणूक घेण्याची विनंती केली. सध्या अमेरिकेत असलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दूरचित्र संवादाद्वारे चर्चा करून २७ मेपूर्वी निवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा चर्चेत आले आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्वत: बोलून दाखवलं आहे.
भाजपकडून जेष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे,हर्षवर्धन पाटील,रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी विधानपरिषदेच्या जागेसाठी गुडघ्याला बाशिंग बधून बसले आहेत.दरम्यान,भाजपकडून जी अनेक नवे चर्चेत आहेत त्यापैकी एक नाव माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. तर दुसऱ्या बाजूला विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या नऊ जागांपैकी चार जागा भाजपच्या वाट्याला येणार आहेत. त्यातील एक जागा भाजपने रिपब्लिकन पक्षाला द्यावी, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री,रामदास आठवले यांनी भाजपकडे केली आहे.
याबाबत ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आठवले यांनी म्हटले आहे, की भाजपला मिळणाऱ्या जागांतील एक जागा रिपब्लिकन पक्षाला देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार आहे. भाजपने एक जागा रिपब्लिकन पक्षाला देऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न करावा.
फडणवीस आणि पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणार असून त्यांना तसे जागा देण्याबाबत ईमेलही करणार असल्याचे आठवले यांनी नमूद केले आहे. भाजपने एक जागा रिपब्लिकन पक्षाला दिल्यास आंबेडकरी समाजाला ताकद मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत त्याचा भाजपला फायदा होणार आहे, असेही आठवले यांनी सांगितले.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

