मुंबई : कोरोनामुळे राज्यातील अनेक दुकानं व व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. मात्र लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात राज्य सरकारने काही ठिकाणी शिथिलता देत दुकानं व काही व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली. त्यातचं केंद्र आणि राज्य सरकारकडून मद्य विक्रीस परवानगी देण्यात आली. या मद्य विक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत दणक्यात वाढ झाली आहे. तर राज्यात एका दिवसात तब्बल 62 कोटी 55 लाख रुपयांचे मद्य विकले गेले आहे.
पुढे आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात राज्यात फक्त 35 टक्के मद्य विक्री झाली. या 35 टक्के मद्यविक्री दुकानातून गेल्या 24 तासात तब्बल 62 कोटी 55 लाख रुपयांचे मद्य विकलं गेलं आहे.राज्यात एकूण 33 जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी दिली गेली आहे. तर 9 जिल्ह्यात मद्य विक्रीस परवानगी नाकारली गेली आहे आणि 2 असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये मद्य विक्री सुरू केली होती. मात्र, काही कारणास्तव त्या दोन जिल्हयात मद्य विक्री बंद केली आहे.
अवैध मद्य विक्रीतून जवळपास 13 कोटी रुपयांचा मुद्देमाल उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. राज्यात एकूण 10 हजार 822 परवानाधारक मद्य विक्री दुकाने असून यापैकी फक्त 3 हजार 543 परवानाधारक मद्य विक्री वाईनशॉपमधून मद्य विक्री केली गेली आहे.
मद्य विक्रीतून राज्याला एकाच दिवसात तब्बल 62 कोटी 55 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर उद्या पासून सर्व वाईनशॉपवर टोकन पद्धत सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असून वाईनशॉपवर गर्दी दिसल्यास वाईनशॉप मालकावर कारवाई करण्यात येईल अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
