🕒 1 min read
मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. प्रामुख्याने मुंबई व पुणे या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांना कोरोना विषाणूने चांगलाच विळखा घातला आहे. तसेच दुसरीकडे मात्र कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना पवार म्हणाले की, ‘अधिकाऱ्यांनी मिळून समन्वयाने सुक्ष्म नियोजन करुन आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवून कोरोनाचा फैलाव थांबवावा.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्णांची संख्या वाढत असून ही चिंतेची बाब आहे. बारामती पॅटर्न नुसार कडक निर्बंध पाळून येथील रुग्णसंख्येला आळा घाला,’ असे आदेश पवार यांनी दिले.
दरम्यान, ‘खबरदारीचा उपाय म्हणून झोपडपट्टी परिसरात तपासणी वाढवून या भागातील स्वच्छतेवर भर द्यावा. तसेच येथील नागरिकांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप लवकरात लवकर करा,’ असे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.


