मुंबई : राज्यात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा युध्द पातळीवर झटत आहे. मात्र तरीही या यंत्रणेत डॉक्टरांसह मनुष्यबळाचा मोठा तुटवडा भासत आहे. चीन, इटली, अमेरिका या देशातील कोरोनाचा कहर पाहता जर दुर्दैवाने आपल्या देशात अशी परिस्थिती ओढवली तर याचा गंभीर परिणाम देशाला सहन करावा लागणार हे नक्की.
तर आता दुसरीकडे एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य विभागात डॉक्टरांसह तब्बल १७,००५ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य संचालकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत तब्बल २,५२२ पदे भरण्यात आलेली नाहीत. याशिवाय विशेषज्ञांची तब्बल ४९३ पदे रिक्त आहेत. ही पदे लवकरच भरण्यात येतील अशी आश्वासने वर्षानुवर्षे अधिवेशन काळात आरोग्यमंत्र्यांकडून दिली जातात. प्रत्यक्षात मात्र त्यासाठी कोणतेही महत्त्वाचे निर्णय आजपर्यंत घ्ण्यात आले नाहीत.
एका ज्येष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील हंगामी आरोग्य संचालक डॉ.अर्चना पाटील याच आज संचालक, अतिरिक्त संचालक व सहसंचालकांची भूमिका बजावत आहेत. राज्यात आरोग्य खात्याची तब्बल ५०८ रुग्णालये आहेत. याशिवाय ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्याची काळजी घेण्यासाठी १८२८ प्राथमिक आरोग्यकेंद्रे, १०,६६८ उपकेंद्रे आहेत. तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या २८१ मंजूर पदांपैकी १५७ पदे रिक्त आहेत तर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या ६४३ पदांपैकी ३६८ पदे भरण्यातच आलेली नाहीत. बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थीरोग आदी विशेषज्ञांची ६२७ पदे मंजूर असली तरी त्यातील ४९३ पदे आजघडीला रिक्त आहेत. परिचारिकांची ३० टक्के तसेच आरोग्य सेविका व सहाय्यकांची तब्बल ५० टक्के पदे रिक्त असल्याचेदेखील यावेळी या अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशातच, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लूसह, मलेरिया, न्युमोनिया, साथीचे आजार, मधुमेह, उच्चरक्तदाबासारखे असंसर्गजन्य आजार, अपघात, बालआरोग्यासह, मनोरुग्ण, तसेच अपघातापासून वेगवगेळ्या आजारावर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक ही अत्यंत महत्त्वाची पदे आहेत. मात्र ग्रामीण वा दुर्गम भागात डॉक्टरांना पुरेसे मानधन मिळत नसल्याने डॉक्टरांची तसेच विशेषज्ञांची हंगामी पदे भरण्यासाठी वेळोवेळी जाहिरात देऊनही डॉक्टर मिळत नाहीत.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या या रिक्त पदाबाबत विचारले असता आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘“आरोग्य विभागातील विशेषज्ञांची सर्व पदे येत्या तीन महिन्यांत कोणत्याही परिस्थितीत भरण्यात येतील. १७ हजार पदे ही बऱ्याच काळापासून रिक्त असून यापूर्वी पदे का भरण्यात आली नाही याची मला कल्पना नाही. तथापि आरोग्य विभाग हा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने यातील सर्व पदे ही आरोग्य खात्यामधूनच भरण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. आरोग्य खात्याला अधिक निधी मिळाला पाहिजे व सध्याची परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात आरोग्याला चांगला निधी मिळवून देईन,” असे राजेश टोपे यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

