🕒 1 min read
पुणे : रत्नाकर डान्स अकॅडमीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने अकॅडमी तर्फे राज्यातील पाच हजार लावणी नृत्यांगनांचा विश्वविक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवारी (ता.१५) खडी मशीन चौक येथील ठोसर ग्राउंड येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. कार्यक्रमादरम्यान ६० लावणी सम्राज्ञींना नृत्य रत्न व युवा रत्न देऊन गौरविण्यात येणार आहे. महाराष्ट्राची लोककला लावणी जपण्यासाठी आणि तिची पाळेमुळे वृद्धिंगत करण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून यामध्ये सहा ते साठ वयापर्यंतच्या महिला सहभागी होणार असल्याची माहिती अकॅडमीचे प्रमुख रत्नाकर शेळके यांनी दिली.
शेळके म्हणाले, सदर लावणी विश्वविक्रमासाठी नृत्यांगनासह अभिनेत्री, अनाथ, अंध, अपंग आणि विदेशी मुलींचा सहभाग असणार आहे. तसेच नांदेड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचा यात सहभाग असणार आहे. यामध्ये मुख्य आकर्षण सुरेखा पुणेकर, दिपाली सय्यद, सुरेखा कुडची यांसह अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत.
रत्नाकर डान्स अकॅडमी गेल्या २५ वर्षांपासून पुण्यात यशस्वीपणे कार्यरत आहे. अकॅडमीतून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धा, बुगी वुगी, पुणे फेस्टीव्हल, दम दमा दम, एकापेक्षा एक, ढोलकीच्या तालावर, अप्सरा आली अशा विविध पातळीवरील कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून पारितोषिके पटकावली आहे. आज कलासृष्टीत कार्यरत असलेल्या संस्कृती बालगुडे, प्राजक्ता माळी, ऋतुजा जुन्नरकर, साक्षी तिसगावकर, अमित कल्याणकर, स्मिता शेवाळे या अकॅडमीच्या यशाची उदाहरणे आहेत. याशिवाय अकॅडमीतर्फे इच्छुक विद्यार्थी, गरजू विद्यार्थी, शाळकरी विद्यार्थी, डॉक्टर्स आणि अभिनेत्रींनाही नृत्याचे मोफत प्रशिक्षण दिले जात असल्याचे रत्नाकर शेळके यांनी सांगितले.
अकॅडमीने केवळ आर्थिक पातळीवर मर्यादित न राहता अकॅडमीतर्फे वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा होणाऱ्या निधीतून अकॅडमी सामाजिक कार्य करत असते. त्यामध्ये अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मुक बधीर अंध अपंग संस्था, कॅन्सर ग्रस्त संस्थांना मदत केली जाते, असेही शेळके यांनी यावेळी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1205744474661376003?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
