मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेनंतर मशिदीसमोर हनुमान चालीसा आंदोलनाला वेग आले होते. मशिदींवरच्या भोंग्यांच्या संदर्भातील आंदोलनानंतर मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस देणे सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई होत आहे. अनेकांची धरपकड होत आहे. यावरूनच आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. “कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आला नाहीये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही.” अशा संतप्त शब्दात राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे. त्यानंतर आज मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर हे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची यासंदर्भात भेट घेतली आहे.
बाळा नांदगावकर यांनी या भेटीत हनुमान चालीसा आंदोलनानंतर मनसच्या कार्यकर्त्यांवर सरकारकडून होत असलेल्या कारवाईबद्दल गृहमंत्र्यांशी चर्चा केली आहे. कालच राज ठाकरे यांनी ट्विट करून पोलीसांआडून सरकार करत असलेल्या कारवाई बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यातच आता बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. आता या भेटीनंतर बाळा नांदगावकर पुन्हा राज ठाकरे यांच्याशी चर्चा करतील.
राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. पत्रात राज ठाकरे म्हणतात, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी राबवली होती का? आमच्या कार्यकर्त्यांना पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा हैद्राबाद संस्थानातल्या ‘रझाकार’प्रमाणे पोलीस शोधत आहेत. दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कोणी दिलेत हे सर्वांना माहित आहे, असा उल्लेख करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :

