औरंगाबाद : गंगापूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. शिवना, नागझरी, लेंडी या नद्यांना पूर आला असून नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मागील पंचनामे अजूनही पूर्ण झालेले नव्हते तोच पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बेहाल करून सोडले आहे.
सोमवार रात्रीपासून तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्याने सर्वच प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. नद्यांना पूर आला तर साठवण तलाव खचाखच भरले आहेत. या पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. सलग चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे तालुक्याची वाटचाल ओल्या दुष्काळाकडे असून कापूस, सोयाबीन, बाजरी, मका, तूर ही पीक जमिनदोस्त झाली तर कापसाच्या वाती झाल्या, काढणीला आलेल्या भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
हत्ती नक्षत्रातील या पावसाने तालुक्यात सर्वत्र शेतीपिकांची वाईट परिस्थिती झाली आहे. अनेक गावातील घरात पावसाचे पाणी शिरले असून लेंडी नदीला पूर आल्याने बोलठान, वडाळी, खोपेश्वर या गावांचा संपर्क तुटला आहे. बोलठाण येथील सखल भागातील घरात पाणी शिरले. त्याच प्रमाणे नागझरी नदीला देखील पूर आला. शहरातील जयसिंग नगरमध्ये पाणी निघण्यासाठी जागा नसल्याने अनेक घरात पाणी शिरले तर दर्गा परिसरातील ओढ्याला पूर आल्याने स्मशानभूमीला पाण्याने वेढा घातला. जिल्हा परिषद शाळेला तळ्याचे रूप आले. या अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, या नैसर्गिक संकटाला कसा सामना करावा या चिंतेत शेतकरी पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राहुल गांधींकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख करत मोदींवर टीका; ‘सावरकरांचे लिखाण वाचाल तर..’
- ‘मुख्यमंत्र्यांचे कोकणातील आश्वासन अजून हवेतच आणि आता मराठवाड्यासाठी नव्या वाफा…’
- भारतीय लष्कराच्या गौरवशाली आणि अभिनास्पद कामगिरीचे दर्शन घडवणारे मुंबईत उभे राहणार लष्करी संग्रहालय
- आम्ही बांधावर गेलो तेव्हा सत्ताधारी बांधावर गेले; पंकजा मुंडेंचा सरकारवर निशाणा
- अस्मानी संकट ! अतिवृष्टीने 436 नागरिकांनी जीव गमावला, तर 196 जणांचा वीज पडून मृत्यू

