पुणे : वाढत्या कोरोनाच्या संसार्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातील दाट लोकवस्तीमधील पाच क्षेत्रीय कार्यालयांमधील सुमारे 71 हजार कुटुंबांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची तयारी महापालिकेने पोलिसांच्या मदतीने सुरु केली आहे. सुरवातीला पहिल्या टप्प्यात वीस हजार लोकांचे स्थलांतर केले जाणार आहे.
तर स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना महापालिकेच्या शाळा, खासगी मंगल कार्यालय, वसतिगृहे ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेले भवानी पेठ, ढोले पाटील रोड, कसबा पेठ, घोले रोड आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या भागातील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात येणार आहे.
शहरातील एकूण कोरोनाबाधितांमध्ये 75 टक्के रुग्ण या भागातील रहिवासी आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्येही याच भागातील प्रमाण जास्त आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या दाट लोकवस्ती वर महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे.
या परिसरात दाट लोकवस्ती आहे. अनेकांची घरे सुमारे शंभर चौरस फुटांची आहेत. कुटुंबात चार ते पाच जण असतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन होत नाही परिणामी कोरोनाच्या संसर्गाचा धोका कायम आहे. 71 हजार कुटुंबे स्थलांतरित केल्यास ही लोकसंख्या सुमारे साडेतीन लाख असेल.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
