🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या संकटात मुंबईतील खाजगी दवाखान्यातील डॉक्टरांनी काही दिवस कोविड 19च्या रुग्णांना सेवा देण्यासाठी सरकारी रुग्णालयात जावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण-संशोधन मंडळाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केलं आहे. तसेच जे या आवाहनाला प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुंबई महापालिकेने वारंवार आवाहन करुनही अनेक खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने, नर्सिंग होम सुरु केलेले नाहीत. परवाना रद्द करण्याचा इशारा देऊनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. त्यामुळे आता सरकारने मान्यताप्राप्त आणि पदवीधर डॉक्टरांनी कोविड-19 चे रुग्ण असलेल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबाबत आदेश काढले आहेत.
वैद्यकीय शिक्षण संशोधन मंडळाने जारी केलेल्या पत्रकात डॉ. तात्याराव लहाने यांनी खासगी डॉक्टरांना आवाहन केलं आहे की, कोविड-19 रुग्णांच्या उपचारांसाठी किमान 15 दिवस तुमची सेवा द्या. तुम्हाला ज्या ऐच्छिक परिसरात सेवा द्यायची आहे त्याची माहिती महापालिकेचे अधिकारी मिलिंद कांबळे यांना द्या.
तसंच या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास खासगी डॉक्टरांवर कारवाई केली जाऊ शकते, असंही तात्याराव लहानेंनी म्हटलं आहे. ड्युटीवर गैरहजर राहणं हे मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या आचारसंहितेचं उल्लंघन समजून अशा डॉक्टरांवर साथरोग प्रतिबंध कायदा 1897 नुसार कारवाई करण्यात येईल, असं डॉ. लहाने यांनी सांगितलं.
दरम्यान देश सध्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक आहे. केवळ राज्यातच नव्हे देशातही कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या मुंबईत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा सामना अधिक प्रभावीपणे करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आणि महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
