मुंबई : एनएसईएल अपहार प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक याचे निकटवर्तीय योगेश देशमुख यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली आहे. त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीकडून मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दिला होता. मात्र, सक्तवसुली संचालनालयाची ही विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्या. संदीप शिंदे यांनी ईडीचा अर्ज फेटाळून लावला. तसेच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाता यावे म्हणून निर्णयाला चार आठवड्यांची स्थगिती देण्याची विनंतीही त्यांनी फेटाळली.
योगेश देशमुख हे प्रताप सरनाईक यांचे निटकवर्तीय असल्याचे सांगत ईडी आता त्यांच्या मागावर असल्याचा दावा भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी समाज माध्यमावरून केला होता. योगेश देशमुख यांना ईडीनं मनी लाँड्रींग प्रकरणी अटक केली होती. सुमारे साडे पाच हजार आर्थिक घोटाळ्याशी संबंधित एनएसईएल हे प्रकरण आहे. एनएसईएल म्हणजेच नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड प्रकरणात यावर्षी एप्रिल महिन्यात विकासक योगेश देशमुखला अटक करण्यात आली होती, मात्र पुढे पीएमएलए कोर्टानं त्यांची जामीनावर सुटका केली होती. हाच जामीन रद्द करण्यासाठी ईडीनं मुंबई उच्च न्यायालयात या निकालाला आव्हान दिलं होतं जे फेटाळण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
आस्था ग्रुपने एनएसईएलची २५० कोटी रुपयांची फसवणूक करून घोटाळा केला आणि सरनाईक यांच्या विहंग ग्रुप कंपनीने घोटाळ्यातील पैशांचा अपहार करण्यास मदत केली. आस्था ग्रुप व विहंग ग्रुपने एकत्र येऊन विहंग हाऊसिंग प्रोजेक्ट कंपनी सुरू करून योगेश देशमुख यांच्या मदतीने टिटवाळ्यामधील अनेक भूखंड विकत घेतले. देशमुख यांनी अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी विकत घेतल्या आणि त्यासाठी घोटाळ्यातील २२ कोटी रुपये वापरण्यात आल्याचे प्रथम समोर आले. मात्र, प्रत्यक्षात जमिनी विकत घेण्यासाठी केवळ एक कोटी रुपये वापरले आणि ११ कोटी रुपये सरनाईक यांच्या कंपनीत वळते करून देशमुख यांनी स्वत:कडे दहा कोटी रुपये ठेवले’, असा ईडीचा आरोप आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार घेणार मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा!
- रामदास आठवलेंकडून एमआयएम खा.ओवैसींच्या ‘त्या’ वक्तव्याचे समर्थन, म्हणाले..
- अँटिलिया स्फोटक प्रकरण, बोगस पुराव्यासाठी परमबीर सिंह यांनीच दिली ५ लाखांची लाच
- मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर
- धनंजय मुंडेंना होमपिचवर गुगली! करुणा शर्मा यांच्या समर्थनात भाजप मैदानात उतरणार

