टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेना युतीची चर्चा जोरात सुरु आहे. दोन्ही पक्ष एकमेकांसमोर अटी घालताना दिसत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी एकजूट होऊन सत्ताधाऱ्यांना धुळीत मिळवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पण भाजप – शिवसेना युती मात्र अजूनही अनिश्चितच आहे. त्या संदर्भातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामध्ये युतीच्या प्रश्नांनबाबत सकारात्मक चर्चा झाली. असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेले अनेक दिवस शिवसेना आणि भाजप यांच्यात युतीबाबत चर्चा आणि बैठका होत आहेत पण अद्याप कोणत्याच प्रकारची निश्चितता समोर आलेली नाही. शिवसेनेनं भाजप पक्षाला युतीच्या अंतिम निर्णयासाठी ४८ तासांचा वेळ दिला होता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून युतीबाबतचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. पण गुरुवारी रात्री झालेल्या बैठकीत जागा वाटप संदर्भात कुठल्याच प्रकारची बोलणी झालेली नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं.
दरम्यान आतापर्यंत झालेल्या बैठकीत भाजप लोकसभेला २५ जागा स्वतः कडे ठेवणार आहे तर शिवसेना २३ जागांवर लढणार असल्याच ठरलं आहे. तसेच विधानसभेसाठी देखील या दोन्ही पक्षांनी समझोता केला आहे. तरी कोण कोठून लढणार याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही.तसेच शिवसेनेनं भाजपला युती करावयची असेल तर शिवसेनेला हवा असलेला एखादा मोठा धोरणात्मक निर्णय सरकारने घ्यावा. ही मोठी व महत्वाची अट घातली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापैकी एकाने मातोश्रीवर येऊन शिवसेनेची मनधरणी करावी. अशी भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवणारी अट घातली. तर शिवसेनेनं भाजपला युतीबाबत अंतिम निर्णयासाठी ४८ तासांची मुदत दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

