बारामती : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांनी घरबसल्या महावितरणची वेबसाईट, मोबाईल ॲप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरु आहेत. मात्र वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांची गैरसोय होणार नाही यासाठी घरबसल्या ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांसाठी महावितरण मोबाईल ॲपमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने एकाच खात्यातून ग्राहकांना त्यांचा स्वतःच्या अनेक वीजबिलांचा भरणा करण्याची सोय आहे. यासोबतच महावितरणने लघुदाब वीजग्राहकांना ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल ऍपची सेवा उपलब्ध आहे. चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाईन भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्सचा पर्याय उपलब्ध आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळत आहे.
वीजबिल भरण्यासाठी महावितरणच्या ‘ऑनलाईन’ सेवेला बारामती, केडगाव व सासवड विभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वीजग्राहकांनी घरबसल्याच ‘ऑनलाईन’द्वारे वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणकडून 23 मार्चपासून छपाई केलेल्या कागदी वीजबिलांचे वितरण बंद करण्यात आले आहे. मात्र मोबाईल क्रमांकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे वीजबील पाठविण्यात येत आहे. याशिवाय वेबसाईट व मोबाईल ॲपवर वीजबिल पाहण्यासाठी व भरणा करण्यासाठी उपलब्ध आहेत.
क्रेडीट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीज बिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’चे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क आहेत. नेटबॅकींगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ‘ऑनलाईन’ भरणा करण्यासाठी याआधी 500 रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते. परंतु क्रेडीट कार्ड वगळता नेटबॅकिंग, डेबीट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’द्वारे होणारा वीज बिल भरणा आता निःशुल्क आहे. तसेच ‘ऑनलाईन’ बिल भरण्यासाठी दरमहा 500 रुपयांच्या मर्यादेत 0.25 टक्के सूट देण्यात येत आहे. वीजग्राहकांनी विजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या ‘ऑनलाईन’ सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
महावितरणने वीजग्राहकांसाठी तयार केलेले मोबाईल अॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून ‘अन्ड्राईड’, ‘विंडोज’ व ‘आयओएस’ या आँपरेटींग सिस्टीमच्या मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड होईल अशी सुविधा आहे. महावितरणच्या www.mahadiscom.in या वेबसाईटसह गुगल प्लेस्टोर, ऍपल ऍप स्टोरमधून डाऊनलोड करण्याची सोय आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

