🕒 1 min read
करमाळा- आगामी लोकसभा निवडणूक त्रिशंकू होणार हे भाकित ठेवून अॕक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर होण्यासाठी लोकसभेतून निवडून आले तर फायदा होईल यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार लोकसभेला निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.मागील दोन निवडणूकी प्रमाणे माढ्याचा तिढा बुधवारी सुटला आहे. शरद पवार माढ्यातून पुन्हा एकदा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आणि संपूर्ण महाराष्ट्र भर चर्चेला उधान आले आहे.
२००९ साली पंढरपूर मतदारसंघाचा पुनर्रचना होऊन माढा मतदारसंघ झाला, त्यावेळी ही माढ्याचा तिढा वाढलेला होता, खासदार सुप्रिया सुळे बारामतीतून निवडणूक लढल्यामुळे शरद पवार यांनी माढ्यातून निवडणूक लढविण्याचे ठरविले कारण माढा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सुरक्षित होता. २००९ ला त्यांनी भाजपचे उमेदवार आणि विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा पराभव केला होता.
२०१४ ला मोदी लाट आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी विरोधी लाट असल्यामुळे शरद पवारांनी माघार घेतली आणि इथून पुढे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला, तरुणांना संधी देऊ असे सांगून शरद पवारांनी राज्यसभेवर जाणे पसंत केले.२०१४ ला मोदी लाट असूनही खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी महायुतीचे सदाभाऊ खोत यांचा पराभव केला आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधित ठेवले.
२०१९ला माढ्याचा तिढा पुन्हा वाढला माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केला माढ्यात गटबाजी होऊ नये आणि कार्यकत्यांच्या आग्रहास्तव आपण निवडणूक लढविणार असल्याचे शरद पवारांनी सांगत माढ्यातून पुन्हा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर करून माढ्याचा तिढा सोडविला खरा परंतु आगामी लोकसभेला त्रिशंकू स्थिती होईल हे भाकित ठरवून अॕक्सिडेंटल प्राईम मिनीस्टर होण्यासाठी लोकसभेवर जाणे गरजेचे असल्यामुळे शरद पवार यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात असून शरद पवारांनी मात्र कार्यकत्यांच्या आग्रहाचे कारण देत कार्यकत्यांना निवडणूक न लढविण्याचा दिलेला शब्द मोडला असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे.


