🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज (ता. 29) निवृत्त झाले. त्यांच्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त पदावर कोणाला संधी मिळणार याबाबत अनेक चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. मात्र देशातील अत्यंत महत्त्वाचं आणि प्रतिष्ठेचं पद असलेल्या मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांची वर्णी लागली आहे. ठाकरे सरकारने परिपत्रक काढून ही घोषणा केली.
परमबीर सिंह हे यापूर्वीही मुंबई पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंह यांना डावलून संजय बर्वे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नेमणूक केली होती. परमबीर सिंह यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्तही होते. सध्या परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत.
संजय बर्वे यांच्यानंतर मुंबईचा पोलिस आयुक्तपदासाठी परमबीर सिंह यांच्याशिवाय राज्याच्या टेक्निकल विभागाचे प्रमुख हेमंत नगराळे, राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, पुण्याचे पोलिस आयुक्त के वेंकटेशम, सध्या केंद्रात प्रति नियुक्तीवर असलेले सदानंद दाते यासारख्या दहा-बारा अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत असलेल्या दहा ते बारा जणांना मागे टाकत परमबीर सिंह यांची निवड झाली आहे.
तर, परमबीर सिंह यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार बिपिन के. सिंग (अपर पोलिस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपवण्यात आला आहे.


