टीम महाराष्ट्र देशा : मुंडे घराण्यातील दुसरी पिढी असणाऱ्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. आता पंकजा मुंडे मंत्री असणाऱ्या महिला व बालविकास विभागात १०६ कोटींचा मोबाईल खरेदी घोटाळा झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. तर अशा गलथान आरोपांना उत्तर द्याव असं मला वाटत नाही, माझा विभाग सक्षम आहे. मी कुठलाही निर्णय घेतला तरी तो कसा चुकीचा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न एक व्यक्ती करत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तसेच मागील चार वर्षापासून मी घेतलेल्या निर्णयांमध्ये भ्रष्ट्राचार कसा झाला हे सांगण्याचा प्रयत्न होत असून त्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचं त्या म्हणाल्या.
काय आहे धनंजय मुंडे यांचा आरोप
पंकजा मुंडें कारभार पाहता असलेल्या महिला व बाल कल्याण विभागात हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिला व बाल कल्याण विभागा अंतर्गत संगणक माहिती सक्षम रीयल-टाईम मॉनिटरींग करण्यासाठी राज्यातील 85 हजार 452 अंगणवाडी केंद्रासाठी लाखभर मोबाईल खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये बंगळुरूमधील एम एस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि.या कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा 17 हा मोबाईल खरेदी करण्यात येणार आहेत.
संबंधित मोबाईलचे बाजारमूल्य 6 हजार 499 रूपये असताना पंकजा मुंडे यांच्या विभागाकडून प्रती मोबाईल 8 हजार 777 रुपये देण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. प्रत्येक मोबाईल मागे वाढीव 2200 रूपये देत तब्बल १०६ कोटींचा भ्रष्ट्राचार करण्यात आल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची तत्काळ चौकशी करण्याची मागणी देखील मुंडे यांनी केली आहे.


