टीम महाराष्ट्र देशा : बटाट्याचा वापर नेहमीच्या भोजनात सर्रास आढळतो. स्नॅक्समध्ये तर बटाटा असतोच असतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचा दर चांगलाच वधारला आहे. घाऊक बाजारात १० ते १५ रूपये किलो दराने मिळणारा बटाटा आता दर्जानुसार २०-२५ रूपयांवर पोहोचला आहे. तर किरकोळ बाजारात बटाटा ३०-५० प्रती किलो मिळत आहे.
यंदा अवकाळी पावसाचा फटका सर्वच फळभाज्यांना बसला आहे. त्यात बटाट्याला मोठा फटाका बसला आहे. पावसामुळे यंदा तळेगाव आणि इंदौर येथील बटाट्याचा हंगाम एक महिना उशिरा चालू झाला. जरवर्षी हा हंगाम डिसेंबरमध्ये सुरू होतो. मात्र यंदा हा हंगाम जानेवारीमध्ये सुरू झाला आहे. तसेच शीतगृहातील माल संपत आला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव वाढत होते. पुढील काही दिवसांत भाव कमी होतील असा अंदाज मार्केट यार्डातील व्यापारी अप्पासाहेब कोरपे यांनी व्यक्त केला.
पुण्यातील बाजारात इंदौर, आग्रा आणि तळेगाव येथून बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. दररोज साधारणतः ५० ते ६० ट्रक आवक होते. तर पुण्यातील बाजारातून पुणे शहर उपनगरे यासह मध्यप्रदेशातून बटाट्याला मोठी मागणी असते. इंदौर येथील बटाट्याचा हंगाम डिसेंबर मध्ये सुरू होऊन फेब्रवारीपर्यंत असतो. तळेगांव येथील हंगाम जानेवारी ते मार्च पर्यंत असतो. तर आग्रा येथील हंगाम फेब्रुवारीमध्ये सुरू होऊन मार्च पर्यंत हंगाम असतो. परंतु यंदा मात्र अवकाळी पावसामुळे हंगाम पुढे गेले आहेत.
सर्वसामान्यांच्या ताटात कायम आणि हमखास दिसणारी भाजी म्हणजे बटाटा. मात्र, आता या बटाट्यानेच भाव खाल्ला आहे. बटाट्याचे शेकडो पदार्थ अगदी जिभेवर रेंगाळत राहतात. मात्र, आता बटाट्याचा दर वाढल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या भोजनावर, स्नॅक्सवर झाला आहे.
बटाट्याचे घाऊक बाजारातील मागील सहा महिन्याचे दर्जानुसार कीलोचे भाव
महिना — आग्रा भाव — इंदौर भाव — तळेगांव भाव
सप्टेंबर — १२ ते १५ — १६ ते १८ —
ऑक्टोंबर — १५ ते १८ — १८ ते २० —
नोव्हेंबर — १५ ते १८ — १८ ते २० —
डिसेंबर — १९ ते २२ — २० ते २२ — १८ ते २०
जानेवारी — २२ ते २५ — २० ते २३ — १७ ते २०
काय आहेत दर वाढीची कारणे.
– अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
– यंदा हंगाम उशिरा.
– शीतगृहातील माल संपत आला.
– आवक कमी आणि मागणी जास्त.
तळेगांव आणि इंदौर येथील हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत बटाट्याचे भाव हळू हळू उतरत जातील. भाव वाढीच परिणाम मागील काही दिवसात वेफर्स कंपन्या वर ही झाला होता.
(अप्पासाहेब कोरपे, व्यापारी, मार्केट यार्ड)
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

