कल्याण : राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असेल तरी दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ही वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होण्यास मदत होत आहे. गुरुवारी कल्याण डोंबिवली शहरातील 51 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. त्यामुळे वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या शहरासाठी हे दिलासा देणारे वृत्त आहे.
विविध रूग्णालयात हे कोरोनाबाधित उपचार घेत होते. उपचाराअंती त्यांचे अहवाल हे निगेटीव्ह आले आहेत. त्यांची प्रकृती आता ठणठणीत असून त्यांना आता रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत एकूण 391 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
दरम्यान राज्यात गुरुवारी दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने भर पडली आहे. गेल्या 24 तासात 1602 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नवीन कोरोनाबाधित रुग्णांसह राज्यातील एकूण संख्या 27 हजार 524 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात 512 रुग्णांनी कोरोनावर मात असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
तर मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. एकट्या मुंबईची कोरोनाबाधितांची संख्या आता 16 हजार 738 वर पोहोचली आहे. मुंबईत आतापर्यंत तब्बल 621 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 314 वर पोहोचली आहे. तर 175 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
