तुळजापुर : राज्यात परतीच्या पावसामूळे शंभर लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिंकांचे नुकसान झाले आहे. तर सरकार 70 लाख हेक्टरवरचे नुकसान झाल्याचे म्हणत आहे. सरकारची ही आकडेवारी योग्य नाही.शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची गरज आहे.मात्र सरकार चालढकल करीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना जाहिर झालेली मदतही अद्याप मिळालेली नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.
राजू शेट्टी म्हणाले, परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्व विभागांतील शेतकरी कोलमडला आहे. कोकणातील भातशेती गेली. आंब्याचा हंगाम दोन महिने पुढे गेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात महापूर आणि अतिवृष्टी झाली. मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, मका आदी पिके वाया गेली. ज्वारी काळी पडली. रब्बी पेरणीचा हंगाम दोन महिने पुढे गेला आहे. पेरणी करता येत नसल्याने रब्बीबाबत भवितव्यही अंधारात आहे. याकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही असं शेट्टी म्हणाले .
पुढे बोलताना शेट्मोटी म्ठेहणाले, नुकसान झालेले असताना पंचनाम्याची गरज काय? शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळायला हवी. शेतकऱ्यांनी विमा उतरविताना सर्व कागदपत्रे कंपन्यांना दिली आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर संरक्षित रक्कम वर्ग करावी. शेतांच्या साफसफाईसाठी तातडीने मदत द्यावी.
विमा कंपन्यांनी मागील चार वर्षांत बारा हजार कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. शेतकऱ्यांच्या खिशातून विमा कंपन्यांनी नफा कमविला आहे. विमा कंपन्या आणि सरकारविरोधात प्रसंगी तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा दिला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्यासह अमरसिंह कदम, अभिजित संगमे, तानाजी पाटील, दुर्वास भोजने आदी उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
