🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार आहे. एकाच ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय कारभार करणे सोपे होईल यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. यावर आता राज्यातील काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. तर शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
केवळ नाव दिल्याने कुठलेही शहर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र होत नसते. IFSC हे नाव घेतले म्हणून गांधीनगरला ते वित्तीय सामर्थ्य मिळणार नाही. जागतिक आर्थिक केंद्र मुंबईची ताकद राहीलच, ती शक्ती फक्त मुंबईतच आहे हे जग जाणते, अशी टीका सुभाष देसाई यांनी केली आहे.
देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईचे विशेष महत्व आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. राज्याचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रकार आहे. आजही मुंबई महाराष्ट्राला आणि देशाला पोसते. एवढा व्यवहार मुंबईतून होतो. त्यामुळे महाराष्ट्र दिनीच हा प्रकार करणे हे दुर्दैवाचं आहे, अशी प्रतिक्रिया अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
तर सत्यजित तांबे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. IFSC चे मुख्यालय गुजरात ला जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असताना IFSC मुंबईत BKC येथे असेल असे आश्वासन दिले होते. पण आता, भाजप शांत का, असा थेट सवाल उपस्थित केला आहे. मुंबईचे आर्थिक राजधानी म्हणून असलेले महत्व कमी करण्याच्या मोठ्या षडयंत्राचा हा भाग आहे, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.


