मुंबई : कोरोनाचं सावट कमी झाल्यानंतर राजकीय पक्ष येत्या स्थानिक निवडणूक लक्षात घेता पुन्हा जोमानं तयारीला लागल्याचं दिसून येत आहे. शिवसेना देखील पक्षबांधणीसाठी सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली.
या बैठकीला शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख उपस्थित होते. मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच या सर्व नेत्यांची बैठक पार पडल्याने कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार याकडं लक्ष लागलं होतं.
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित सेना नेत्यांना संबोधित करताना भाजपवर निशाणा साधला. तर, येत्या काळात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. ‘दुसऱ्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले, नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती. पण भविष्यात शिवसेना देशाचं नेतृत्व करेल,’ असं भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी यावर पलटवार केला आहे. अत्यंत मार्मिक शब्दात राणेंनी ठाकरेंचा समाचार घेतला आहे. ‘२७२ खासदार लागतात केंद्रात सत्ता बसवायला, २७२ कार्यकर्ते नाही. २०२४ पर्यंत २७२ कार्यकर्ते जरी राहिले तरी भरपूर झाले’, अशा आशयाचे ट्वीट करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचं ‘शिवसंपर्क अभियान’ चालू शकतं तर मग शिवभक्तांच्या शिवजयंतीवरच निर्बंध का ?
- ‘काँग्रेसचा खोटारडेपणा असाच सुरु राहिला तर काँग्रेस इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही’
- संजय राठोडांनी राजीनामा दिला ही माहिती चुकीची; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
- ‘रिहानाने आमच्या हिंदू दैवताची खिल्ली उडवली, ते अतिशय नीच कृत्य आहे’
- फासे पलटणार ? आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नाही; मलिकांची फडणवीसांवर टीका


