मुंबई : कोरोनासारख्या संकटात कामगार वर्ग हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे आणि म्हणूनच त्याच्या प्रत्येक संकटात त्याचीशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेऊन त्याच्या समस्या वेळीच सोडविल्या पाहिजे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विविध कामगार संघटनांशी आज संवाद साधून त्यांनी कामगार क्षेत्रातील समस्यांबाबत सखोल आणि व्यापक चर्चा केली. माथाडी कामगारांच्या समस्या श्री नरेंद्र पाटील यांनी सांगितल्या. बेस्टच्या कर्मचार्यांवर मोठी जबाबदारी असली तरी त्यांना सुरक्षेचे कुठलेही उपाय पुरविण्यात आलेले नाही. सॅनेटायझर, मास्क, सुरक्षा किट असे कोणतेही साहित्य त्यांना पुरविण्यात आलेले नाही. परिणामी आज बेस्टमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेच आहे, असे श्री शशांक राव यांनी सांगितले. त्यांनी बेस्ट कर्मचारी, रिक्षाचालक, फेरीवाले, गुमास्ता कामगार यांच्याही समस्या सांगितल्या.
संघटित क्षेत्र, असंघटित क्षेत्र, बेरोजगारीचे प्रश्न, कामगारांची सुरक्षा, काम करीत आहेत तरी वेतन मिळत नसल्याच्या समस्या, नाभिक समाज, घरकाम करणार्या महिला, बांधकाम कामगार, कामगारांचे स्थलांतर अशा विविध घटकांबाबत यावेळी चर्चा झाली. हे विषय निश्चितपणे शासन स्तरावर उपस्थित करण्यात येतील आणि आम्ही सारे त्याचा पाठपुरावा करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी कामगार मंत्री संजय कुटे, महाराष्ट्र राज्य संघटित-असंघटित भारतीय बहुजन कामगार संघाचे संजय केणेकर, क्रांतिवीर जनरल कामगार युनियन, पुणेचे गणेश ताठे, श्रमिक एकता महासंघाचे केशवराव घोळवे, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे किशोर ढोकले, श्रीपाद कुटासकर, रवींद्र देशपांडे, अण्णा धुमाळ, राष्ट्रीय सर्व श्रमिक संघाचे प्रमोद जाधव, जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे संजय हाळणोर, कामगार शक्ती संघटनेचे गौतम खरात, अखिल राष्ट्रीय सिने कलाकार कामगार संघटना विजय सरोज, रवींद्र पुरोहित, अनिल ढुमणे, बांधकाम मजदूर संघाचे जयंतराव देशपांडे, वेदा आगटे या चर्चेत सहभागी झाले होते.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

