औरंगाबाद : वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात रिक्त असलेल्या एमडी मेडिसिन डॉक्टरसाठी अठरा महिने सातत्याने मागणी केल्यानंतर गुरुवारी (दि.२९) नियुक्ती करण्यात आली आहे. गंगापूर येथील डॉ. राजेश पवार यांची या ठिकाणी नेमणूक केली आहे. राष्ट्रवादीचे आ. सतिश चव्हाण यांच्या पुढाकाराने हि नियुक्ती झाली आहे. त्यामुळे याठिकाणी असलेल्या शिवसेना आ. रमेश बोरनारे यांना जे जमले नाही ते राष्ट्रवादीच्या आमदाराने करुन दाखवल्याची चर्चा होत आहे.
वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एमडी मेडिसिन डॉक्टर चे पद १८ महिन्यांपासून रिक्त आहे. हे पद रिक्त असल्याने कोरोनाच्या या संकटात त्याची उणीव मोठ्या प्रमाणात जाणवली. एमडी मेडिसिन डॉक्टर नसल्याने ट्रॉमा केअर मधील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात अडचणी येत होत्या. व व्हेंटिलेटरची सुविधा असूनही ती वापरता येत नव्हती. तीव्र, मध्यम लक्षणे असलेल्यांना औरंगाबाद नगर, नाशिकला उपचारासाठी धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे याठिकाणी एमडी मेडिसिन किंवा फिजिशियन ची तात्पुरती का होईना नियुक्ती करण्याची मागणी जोर धरत होती.
गेल्या दीड वर्षात प्रत्येक आढावा बैठकीत हा मुद्दा चर्चेला येऊनही त्यावर हालचाल झाली नव्हती. गेल्या आठवड्यात विभागीय महसूल आयुक्त यांच्या बैठकीत आमदार रमेश बोरनारे यांनी एमडी मेडिसिन डॉक्टर देण्याची मागणी केली होती. त्या वेळी गंगापूर येथे उपलब्ध असलेल्या दोन पैकी एक डॉक्टर वैजापूरला देण्याची सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली होती. २७ एप्रिल रोजी आमदार सतीश चव्हाण यांनी भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता.
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲड. प्रताप निंबाळकर यांनी एमडी मेडिसिन नसल्याने गैरसोय होत असून रुग्ण दगावत आहे गंगापूरला दोन एमडी मेडिसिन पैकी एक याठिकाणी घेता येऊ शकतो असे आमदार चव्हाण यांच्या लक्षात आणून दिली. त्यानुसार आमदार चव्हाण यांनी तातडीने विभागीय आयुक्त सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी एमडी मेडिसिन डॉक्टर उपलब्ध करण्याबाबत चर्चा केली त्यानंतर २४ तासात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी डॉ. राजेश पवार यांची वैजापूरला तात्पुरती नियुक्ती केली. त्यामुळे येथील ट्रॉमा मधील सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पेठ बीड येथे जुगार अड्ड्यावर छापा; तिघे अटकेत, सात जण फरार
- ‘अडचणीच्या काळात भारताला मदत करताना अमेरिकेला समाधान वाटतंय’
- कोरोनासाठी आ. सतिश चव्हाण घाटीला देणार ‘इतका’ निधी!
- बीडमध्ये १४७० नवे बाधित; गुरुवारच्या आकड्यांनी चिंतेत भर
- उस्मानाबादेत चाैदा दुकानांना सील, व्यापाऱ्यांमध्ये खळबळ

