मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली होती.
‘जगभरातील कोरोना व्हायरस प्रादुर्भावाचा विचार करता, देशातील लॉकडाऊन हे आधीच जाहीर करायला हवे होते. लॉकडाऊन रात्री 8 वाजता जाहीर करायला लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी या गोष्टी जाहीर करून जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता.’ अस जयंत पाटील त्यावेळी म्हणाले होते. मात्र त्यानंतर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे कोरोना बधितांची संख्या वाढल्याने भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांनी इस्लामपूर येथे कोरोनाची लागण मोदींवर टीका केल्याने झाल्याचा जावई शोध लावला होता.
आता अवधूत वाघ यांच्या याच वाचाळ टीकेचा सर्वच स्थरातून समाचार घेतला जात आहे. या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी निषेध केला आहे. अवधूत वाघ हे एवढे असंवेदनशील असतील असे मला कधीच वाटले नव्हते, अशा शब्दात महेश तपासे यांनी वाघ यांचा समाचार घेतला आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी यावेळेस सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. या संकटच्या काळात कोरोनाची बधा झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची काय अवस्था असेल हे समजून घेण्याचा अवधूत वाघ यांनी प्रयत्न करावा, परमेश्वर त्यांना येणाऱ्या काळात अधिक संवेदनशील बनवो, असे प्रतिपादन तपासे यांनी केले. दरम्यान, अवधूत वाघ यांच्या या वक्तव्यावर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून देखील अवधूत वाघ यांचा खरपूस समाचार घेतला आहे. इस्लामपूरबाबत जे विधान महाराष्ट्रातील चवचाल भाजपवाल्यांनी केले ते मोदींच्या कानावर गेले तर मोदीच अशा भंपक मंडळींच्या बाबतीत कठोर निर्णय घेतील. मोदींवर टीका केल्यास महामारी पसरते अशी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कायद्याने कारवाई व्हावी. ही पंतप्रधान मोदींची तर बदनामी आहेच, पण शाहू, फुले, आंबेडकरांच्या वैचारिक वारशालाही धक्का देणारे हे वर्तन आहे. असा घणाघात सामना मधून केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
