निलंगा : तालुक्यातील हणमंतवाडी (हाडोळी) येथील नाथ महाराज देवस्थानच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल ३,३३,३३३ रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीत जमा करण्यात आले आहेत.रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत या देवस्थानची यात्रा असते.परंतु या वर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळे यात्रा रद्द करण्यात आली होती.
त्यामुळे १३५६ एवढी कमी लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावातील ग्रामस्थांनी एकमताने देवस्थानचा हा निधी देशासमोर आलेल्या कोरोनासारख्या भयावह संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान निधीला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.सदरील निधी तत्काळ ९ एप्रिल रोजी गुरुवारी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत रितसर भरणा करुन सदरील निधी पंतप्रधान निधीस सूपूर्द केला.
यावेळी बँकेत या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रघुनाथ बिरादार,सचिव ज्ञानोबा मुळे यांच्यासह धनराज जाधव,हरीभजन दोडगे,गोरख खुर्दे,नारायण इंगळे,प्रताप बोबे,विनायक खुर्दे,राम बिराजदार,हरीचंदर लष्करे,उत्तम जाधव,माधव बोबे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.हणमंतवाडी सारख्या या छोट्या गावातील नाथ देवालयाने पंतप्रधान सहाय्यता निधीस एवढा भरीव निधी देवून जिल्ह्यातील देवस्थानांसमोर निश्चितच एक आदर्श घालून दिला आहे.नाथ देवस्थानच्या देणगी देण्याच्या या महत्वपूर्ण निर्णयाचे तालुक्यातील अनेकांनी स्वागत केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
