🕒 1 min read
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे बाहेरच्या राज्यातून आलेले अनेक कामगार आणि मजूर हे अडकले आहेत. त्यामुळे आज नाशिकमधून रेल्वेची व्यवस्था करून अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले.
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आज सकाळी या सर्व मजूर आणि कामगारांना विशेष बसद्वारे आणण्यात आले. त्यानंतर फिजिकल डिस्टन्ससह सर्व नियमांचे पालन करून या सर्वांना रेल्वेच्या डब्यात बसवण्यात आले. तत्पूर्वी संपूर्ण रेल्वे निर्जंतुक करण्यात आली होती. त्यानंतर या सर्व प्रवाशांना मार्गस्थ करते वेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, पोलीस आयुक्य विश्वास नांगरे पाटील, जिल्हाधिकारी सुरज मांढरे उपस्थित होते.
गेल्या 23 मार्च रोजी देशभरात लॉक डाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये अनेक उत्तर भारतीय तसेच अन्य राज्यातील स्थलांतरित मजूर आणि कामगार अडकले आहेत. जिल्हा प्रशासन आणि नाशिक महापालिकेने त्यांची निवारा गृहात सोय केली होती. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपताना केंद्र सरकारने काही नियम शिथिल केले असून त्यांना आता त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येत आहे. काल रात्री ३३२ कामगारांना ६ डब्यांच्या विशेष रेल्वेने भोपाळ येथे पाठविण्यात आले आहे. आज लखनऊ येथे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेले असल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनसाठी काही सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठीच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. त्यानुसार मजुरांची ने-आण करण्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था करण्याचे ठरले होते.


