नागपूर : काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार राज्यसभेच्या खासदारांना निरोप देण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांना निरोप देताना मोदी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
‘मला चिंता आहे की गुलाम नबींनंतर जो कोणी हा पदभार स्वीकारेल त्यांना गुलाम नबीजी यांच्यासारखं बनता येईल का ? गुलाम नबी आझाद यांच्यानंतर त्यांच्या पदावर येणाऱ्या नेत्याला त्यांची उणीव भरून काढणे थोडे कठीण जाईल. कारण गुलाम नबी हे पक्षासोबतच देशहिताकडेही लक्ष द्यायचे’, असे म्हणत मोदींनी आझादांचे तोंडभरून कौतुक केले आहे. ‘पद, सत्ता जीवनात येत जात राहते. मात्र, ती कशी पचवावी हे आझाद यांच्याकडून शिकावे’ असे गौरवोद्गार देखील मोदींनी काढले.
दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या तत्परतेची एक आठवण सांगताना मोदींना भावना रोखता आल्या नाहीत. ते क्षणभर थांबले आणि नंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर सडकून टीका केली आहे.
‘पंतप्रधान मोदी यांचे अश्रू हे मगरीचे अश्रू आहेत, ते देशातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं. लोकतंत्रात असा ड्रामा चालत नाही,’ असा खोचक टोला देखील नाना पटोले यांनी लगावला आहे. तर, ‘राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 77 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनात शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे अश्रू भाजपला दिसत नाहीत का ?’ असा सडेतोड सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नागपूरला आले आहेत. यावेळी त्यांनी दिक्षाभूमिला वंदन देखील केलं.
महत्वाच्या बातम्या
- बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी : कर्मचार्यांच्या संपामुळे तीन दिवस बँका राहतील बंद !
- गणेश नाईक फासे पलटण्याच्या तयारीत; शिवसेनेत गेलेल्या नगरसेविकेची ‘घरवापसी’
- इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना अन् आता कर्णधार कोहलीला आणखी एक धक्का !
- फडणवीसांनी घेतलेल्या आणखीन एका निर्णयात ठाकरेंकडून बदल
- दारूण पराभवानंतर आता ‘या’ गेमचेंजर खेळाडूला संधी देण्याची मागणी धरू लागली जोर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
