नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही दारूची दुकानं अजूनही बंद आहेत. ज्या भागात कोरोना बाधितांची संख्या ही अधिक त्या भागात दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश प्रशासने दिले आहेत. त्यातचं आता दुकानं बरेच दिवस बंद असल्याने चोरट्यांनी यावर आता डल्ला मारायचे ठरवले आहे. अशीच घटना नागपूर येथे घडली. दारू चोरण्यासाठी आलेल्या चोरांनी चक्क दुकानं फोडून फक्त 3000 रुपयांची रक्कम लंपास केली आहे.
ही घटना नागपूर मधल्या तुकडोजी चौकाजवळ श्री प्रसाद वाईन शॉपबाबत घडली आहे. झाले असे की,कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारने वाईन शॉप बंदीचे आदेश दिल्यापासून हे वाईन शॉपही बंदच आहे. वाईन शॉपच्या समोर एक वृद्ध चौकीदार रात्री झोपतो. रविवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास एका आॅटोतून पाच सशस्त्र चोरटे आले. त्यांनी चौकीदाराचे हात बांधून त्याला धमकी देत गप्प राहण्याच्या सूचना केल्या.
त्यानंतर चोरटे शटर उचकटून आतमध्ये शिरले. वाईन शॉपच्या काऊंटरच्या पलीकडे मजबूत लोखंडी गेट असून त्याला जाडजूड कुलपे आहेत. ती तोडण्यात चोरट्यांना यश आले नाही. त्यामुळे चोरट्यांनी काऊंटरमध्ये ठेवलेली तीन ते चार हजार रुपयांची नाणी ताब्यात घेऊन बाजूच्या गोदामाकडे धाव घेतली. तेथेही मोठा मद्यसाठा होता. मात्र गोदामाच्याही लोखंडी गेटचे कुलूप तोडण्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान, दिवस उजळत असल्यामुळे रस्त्याने मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची वर्दळ सुरू झाल्याचे लक्षात आल्यामुळे चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला.
सबंधित वाईन शॉपच्या मालकाने घटनेबाबत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सुमारे दोन तासांचा घटनाक्रम वाईन शॉपच्या सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला आहे. यावर पोलीस आता तपास करत आहेत.
दरम्यान देशात आणि राज्यात सोमवारपासून तिसरा लॉकडाऊन कालावधी सुरु झाला आहे. मात्र राज्य सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्यात काही ठिकाणी शिथिलता दिली आहे. तसेच रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तिन्ही झोनमध्ये दारू विकण्यास परवानगी दिली आहे.
देशभरातील अनेक दारुची दुकानं उघडली असून तळीरामांनी अगदी प्रथम कर्तव्य मानत दारू खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. छत्तीसगडमध्ये तर तळीरामांनी दारू खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. तर यामध्ये सोशल डीस्टंंसिंगच्या नियमाचे उल्लंघन केले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

