नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात आत्तापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या १४,३७८ वर पोहचलीय. यात ७६ परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. दरम्यान, यातील १९९२ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय तर ४८० जणांनी आपला जीव गमावलाय. सध्या, देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत ११,९०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान,राज्यात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. नुकतेच कोरोनाचे ३४ नवे रुग्ण आढळून आले, तर ७ जणांचा मृत्यू झाला.पाच जण उपचारानंतर आज घरी परतले. राज्यात आता कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ हजार २३६ वर पोहोचली असून आतापर्यंत १९४ जण दगावले आहेत, तर ३०० जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोना विषाणूबाबत नागरिकांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळावं यासाठी राज्य सरकारनं टेलिकम्युनिकेशन हेल्पलाईन सुरु केली आहे. हे अभियान यशस्वी व्हावं यासाठी राज्यातल्या डॉक्टरांनी सहभागी व्हावं,असं आवाहन सरकारनं केलं आहे.
रायगड जिल्ह्यातल्या १५ तालुक्यांमध्ये गेल्या दोन दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी होत असून, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून पोलिसांनी एकूण ५१ लाख रुपये दंड वसूल केला आहे.
पनवेलमध्ये कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता स्थानिक प्रशासनानं सरकारी रुग्णालयांमध्ये १०० खाटांची व्यवस्था केली आहे. लातूरमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीच्या कृती दलात स्थानिक तरुणांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

