🕒 1 min read
मुंबई :- ‘सामाजिक अंतर आणि आरोग्याच्या अन्य अटींचा विचार करून या क्षेत्रात काम सुरू झाले पाहिजे. पायाभूत क्षेत्रातील कामे आज ठप्प आहेत. ही कामे सुरू झाली पाहिजेत. केंद्र व राज्य सरकारांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना मी तीन पत्रे पाठविली आहेत. टाळेबंदी उठल्यावर दिल्लीत जाऊन स्वत: मोदी यांची भेट घेणार असल्याचं माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
याबाबत ते एका मराठी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना बोलत होते. ते म्हणाले, ‘देशाचं अर्थचक्र सुरु करण्यासाठी मोदी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. सगळं काही सुरळीत झाल्यानंतर सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवावी,’ असं शरद पवार म्हणाले.
तसेच अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी काय करता येईल याची सल्लामसलत करावी आम्ही राजकारण बाजूला ठेवून त्यांना सहकार्य करु,’ असं पवार म्हणाले.
दरम्यान, पुढे खा. शरद पवार म्हणाले, ‘ देशातील लॉकडाउन संपल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये केंंद्र सरकारला भरीव काम करावं लागेल. या सेक्टरला पुनरुज्जीवन देण्यासाठी काही सवलती या सलग द्याव्या लागतील. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणारे कामगार बसून आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरला बळ द्यावंच लागणार, त्याशिवाय पर्याय नाही,’ असं मत त्यांनी मांडले.


