अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं. शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
दरम्यान, शेतकरी आंदोलनला पाठिंबा म्हणून अण्णा हजारे यांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू झाले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार खोटारडे आहे. मला दोन वेळा खुद्द पंतप्रधान आणि दोन कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे आता सुरू असलेल्या आंदोलनाबाबत शेतकऱ्यांनी सावध रहावे. हे आंदोलन मोडून काढले गेले तर पुन्हा होऊ शकणार नाही. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचे नाक दाबावे, त्याशिवाय तोंड उघडणार नाही,’ असे महत्त्वाचे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांना केले आहे. जर यातून प्रश्न सुटला नाही, तर आपण शेवटचे आंदोलन करण्यास पुन्हा मैदानात उतरणार आहोत, असे रणशिंगही हजारे यांनी फुंकले आहे.
दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, यावेळी शेतकरी आपली मागण्यांवर ठाम राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधीनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- देशात 5G सुविधा लवकरच; मुकेश अंबानींची मोठी घोषणा
- ‘…म्हणून भारत बंदमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही’
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- ‘मुखवटे बदलले तरी चेहरे तेच आहेत,डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत’

