अहमदनगर : सरकार आठ दिवसांत जाणार, दोन महिन्यात जाणार असे वारंवार सांगणाऱ्या विरोधीपक्ष भाजपाला पाच वर्षे असेच म्हणावे लागणार आहे. कारण महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच केंद्राकडून तुटपुंजी मदत मिळत असताना सीएसआर फंडाची मदत राज्यातील विरोधी पक्ष 75 हजार कोटी रुपये सांगत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. आमचे लक्ष कोरोना नियंत्रण आणि राज्याची आर्थिक घडी बसवणे यावर असून, भाजप या परिस्थितीत फक्त शब्दांचे राजकारण करत असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले.
सरकारवर टीका करणे हे विरोधी पक्षांचे काम असते. राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसने केलेले आहे. मात्र, सध्या कोरोनाच्या संकटकाळात शरद पवार यांनी मांडलेली भूमिका लक्षात न घेता केवळ शब्दांचे राजकारण करण्याची सवय लागलेली भाजप पवार साहेबांची भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडत आहे. आम्ही सर्व जाती, धर्म, पंथ यांना सोबत घेऊन पुढे जात आहोत. मात्र, राज्यातील अनेक भाजप नेत्यांना सत्तेची घाई झाली असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. दोन महिन्यात येणार, आठ महिन्यात येणार असे म्हणत म्हणत पाच वर्षे भाजपची निघून जाणार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे, असा निर्वाळा आमदार रोहित पवार यांनी यावेळी दिला.
कोरोनाच्या कृपेने 33 वर्ष परीक्षा देणारे चाचा अखेर झाले मॅट्रीक पास!
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अंतर्गत मदभेदाबद्दल आणि सरकारच्या 5 वर्षीय कालखंडाबाबत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला चिमटा काढला आहे. या सरकारचं स्टेअरिंग कुणाच्या हाती आहे, हेच कळत नाही. हे सरकार लिव्ह इन-रिलेशनमध्ये आहे, कुटुंब नाही, त्यामुळे सरकार टिकेल असं वाटत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्यातील कोरोना परिस्थिती, महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्राचे व्हिजन याबद्दल आपलं मत मांडलं.
ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचा होणार अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना होणार थेट फायदा


