सोलापूर : लॉकडाऊनच्या काळात शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांचे हाल होत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांमध्ये समन्वय दिसत नाही. या काळात पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील गायब आहेत. सोलापूर जिल्ह्यासाठी तत्काळ नवा पालकमंत्री नियुक्त करावा, अशी मागणी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
कोरोनाचा विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन केले. सोलापूर शहरातील सर्व व्यवहार बंद झाले आहेत. महापालिका, रुग्णालये, अत्यावश्यक वस्तूची सेवा देणारी दुकाने सुरू असल्याचे जिल्हाधिकारी सांगत आहेत. पण कुणाचा कुणाला ताळमेळ दिसत नाही. दूध विक्री करणाऱ्या माणसाला रस्त्यावर अडवले जाते. भाजीपाला विक्री करणाऱ्याला हुसकावून लावले जाते. पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना पेट्रोल दिले जात नाही. मेडिकलच्या इर्मजन्सीसाठी जाणाऱ्या लोकांना पेट्राल दिले जात नाही अश्या काळात पालकमंत्री सोलापुरात असणे आवश्यक असल्याचं फुलारे यांनी म्हटलं आहे.
सोलापूरच्या विविध भागात हजारो मजूर बिनकामाचे बसले आहेत. त्यांना खायला अन्न नाही. सरकारने मोफत गहू, तांदूळ, दाळ देतो म्हणून सांगितले. कुठे आहे धान्य? लोकांच्या अडचणी कशा दूर होणार. लोक रस्त्यावर आल्यावर अडचणी दूर करणार काय? सोलापूरच्या जनतेला लवकरात लवकर धान्य मिळाले पाहिजे. यासाठी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नियमित बैठका घेतला पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे.
पुढे बोलताना फुलारे म्हणाल्या, पालकमंत्री सध्या कुठेच दिसत नाहीत. सोलापुरात काही वर्षापूर्वी दंगल झाली होती. कर्फ्यु लागला होता. विजयसिंह मोहिते-पाटील आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी सोलापुरात ठाण मांडून परिस्थिती हाताळली हाेती. दिलीप सोपल, लक्ष्मणराव ढाेबळे, आमदार विजयकुमार देशमुख यांनीही पालकमंत्री म्हणून अनेक कठीण काळात चांगले काम केले. या लोकांना आमच्या शहराचे गल्ली बोळ माहित आहेत. वळसे-पाटील आता पुण्यात बसून आहेत. व्हिडिओ काॅन्फरन्स करुन अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख बाहेर पडून काम करीत असताना आमचे पालकमंत्री घरात बसलेत. वळसे-पाटलांनी सोलापुरात येऊन स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत सोलापूर शहरात, ग्रामीण भागात जाऊन पाहणी करायला हवी होती. त्यांना ते जमलेले नाही. त्यांना तत्काळ हटवा. या भागातील माहिती असणाऱ्या नेत्याला पालकमंत्री करा, अशीही मागणी फुलारे यांनी केली आहे.
दरम्यान,जगभरात जीवघेणा कोरोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील 170 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत जगभरात साडेसहा हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 31 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 42 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळ सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमधील मृतांचा आकडा दहा हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 92 हजार 472 आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 5 हजार 992 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्यांचा आकडा 73 हजार 235 वर पोहोचला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

