मुंबई : काही महिन्यांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर आव्हाडांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती. दरम्यान, दोन महिन्यांनी त्यांनी आपली रक्त तपासणी केली. रक्त तपासणी अहवाल सामान्य आल्यानंतर आव्हाड यांनी आता करोना रुग्णांसाठी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये आपण प्लाझ्मा दान करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
‘मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला.आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातुन मी बराही झालो.मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे.येत्या दोन दिवसात मी हॉस्पीटलमध्ये जावुन प्लाझ्मा डोनेट करणार आहे’. अस ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला.आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातुन मी बराही झालो.मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे.येत्या दोन दिवसात मी हाॅस्पीटलमध्ये जावुन प्लाझ्मा डोनेट करणार आहे.#२४तासजनसेवेसाठी
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 17, 2020
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर फिरतीवर असणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये पोलीस प्रशासन, वैद्यकीय प्रशासन आणि पालिका प्रशासनाचा देखील समावेश होता. त्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. करोनाचं निदान झाल्यानंतर आव्हाड यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांच्यावरील उपचारांनंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.
‘गेल्या काही दिवसांपासून करोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईला यश आले असून, मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढेही तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या,’ अशी भावनाही त्यांनी कोरोनामुक्त झाल्यावर व्यक्त केली होती.


