मालेगाव : वेळे मध्ये उपचार घेण्यासाठी दवाखान्यात दाखल झालेले दहा रुग्ण जवळपास बरे होण्याच्या मार्गावर आहेत. लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. मालेगाव मधिल रुग्णांची संख्या जरी वाढत असली, तरी वेळेवर जर रुग्ण दवाखान्यात आले, तर त्यांना बरे करण्याची पूर्ण क्षमता आपल्या आरोग्य व्यवस्थेची आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अथवा गैरसमज न ठेवता, आजाराची कोणती लक्षणे आढळल्यास, तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन कोरोना विषयक तयारीचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित संबंधित अधिकाऱ्यांशी ते बोलत होते. यावेळी इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरचे प्रमुख डॉ.पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत, शिवकुमार आवळकंठे, यांच्यासह अन्य प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मांढरे म्हणाले, कंटेन्टमेंट झोन व बफर झोन मधील उपलब्ध मनुष्यबळ व स्वयंसेवकांचा पुरेपूर वापर करुन महानगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा ह्या तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचत असल्याची खात्री करावी. भाजीपाला व दुधाचे नियोजन यापुर्वीच करण्यात आले आहे त्याप्रमाणे प्रत्यक्ष वितरण होत असल्याची रोज खात्री करावी. मुस्लीम बांधवांना उपवास सोडण्यासाठी लागणाऱ्या फळांचा पुरवठा होण्यासाठी हॉटेल स्टार जवळील मोकळ्या जागेत बॅरिकेटींगसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावी. नागरिकांमध्ये सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घेण्याबाबतही त्यांनी सुचना दिल्या.
मालदे शिवारातील म्हाडाची नवनिर्मीत घरे कोरोना रुग्णांसाठी उपयोगात आणणार
शहरातील कोरोना विषाणूमुळे बाधित होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शहरालगत असलेल्या म्हाळदे शिवारात म्हाडाची नवनिर्मीत घरे उपयोगात आणणार असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी आज सांगितले. म्हाळदे शिवारातील नवनिर्मीत घरांची आज पहाणी करुन तेथील सोयी सुविधांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रशासनाचा आढावा घेतल्यानंतर विश्रामगृहात कृषीमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. यावेळी मंत्री भुसे म्हणाले, दाखल होणारे संशयित कोरोना रुग्णांसह, विलगीकरण केलेली, व ज्यांचे नमुने तपासणीसाठी गेले आहेत अशा रुग्णांच्या नमुन्यांचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त होण्यासाठी पाठपुरावा करावा. त्याच बरोबर अपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रत्येक अधिकाऱ्यांना लेखी स्वरुपात जबाबदारी सोपवावी, आणि प्रत्येकाने ती मनापासून व प्रामाणिकपणे पार पाडावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

