टीम महाराष्ट्र देशा : गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक, आमदार संदीप नाईक आणि ५७ नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. नवी मुंबई हा भाग २०१४च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जायचा. मात्र आता गणेश नाईक यांच्या पक्षांतराच्या वृत्तानं राष्ट्रावादी नवी मुंबईला देखील मुकणार असल्याचं दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई येथे नगरसेवकांच्या गटाने भाजप प्रवेशाबाबत बैठक बोलावली आहे. महापौर जयवंत सुतार यांनी ही बैठक बोलावली असून महापौर बंगल्यावर दुपारी ही बैठक होणार आहे. याबैठकीत नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश असल्याचा निर्णय होणार आहे.
दरम्यान, नगरसेवकांच्या या मताशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप नाईक सहमत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. अलिकडच्या काळात संदीप नाईक यांच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या भेटी वाढल्या असून ते देखील गणेश नाईक यांचे मन वळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जात आहे.
या नवी मुंबईच्या नगरसेवकांनी गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश करावा अशी मागणी धरली आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या दबाव तंत्राखाली गणेश नाईक भाजपात जाणार की आपल्या एकनिष्ठतेच्या भूमिकेवर ठाम राहणार हे काही काळातचं स्पष्ट होणार आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

