कोरोना विषाणूसारख्या (COVID-19) राष्ट्रीय आपत्तीत प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत येथील इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चे खासगी डॉक्टर कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सरसावले आहेत. शहरातील 35 बालरोगतज्ज्ञ व 15 ह्रदयरोगतज्ज्ञ असे एकूण 50 डॉक्टरांचे जून 2020 अखेरपर्यंत सेवा देण्याचे नियोजन व वेळापत्रक तयार केल्याची माहिती आयएमए चे अध्यक्ष डॉ.मयूर शाह यांनी दिली आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या आरोग्यसेवेसाठी मनुष्यबळाची कमतरता भासत असतांना प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला आरोग्य प्रशासनावर गैरसमजातून हल्ले होत आहे. ही अत्यंत खेदाची बाब असून यासाठी वैद्यकीय साक्षरता ही आज काळाची गरज बनली आहे.
डॉक्टरांवरील वाढते हल्ले पाहता रुग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये वैद्यकीय सेवेबद्दल मूलभूत साक्षरता निर्माण व्हायला हवी. डॉक्टरांवरील हल्ल्यांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असला, तरी बदलती परिस्थिती लक्षात घेता डॉक्टरांनी संयम ठेवणे महत्वाचे आहे. यासोबत रुग्णांच्या नातेवाईकांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सहकार्य करायला हवे.
कोरोना विषाणूने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. या महामारीचा मुकाबला आपले आरोग्य प्रशासन स्वत:च्या जिवाची बाजी लावून करत आहे. अशा वेळी त्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे. मालेगाव शहरातील प्रत्येक नागरिकाने ‘जीवनावश्यक काहीच नाही तर जीवच महत्वाचा आहे’ असा विचार केला पाहिजे. अजुनही वेळ गेलेली नाही, लपविण्यासारखा हा आजार नाही. ज्यांना कुणाला कोरोना विषाणूची लक्षणे दिसत असतील त्यांनी तात्काळ सामान्य रुग्णालयात येवून तपासण्या करून कोरोनावर मात करावी. प्रामुख्याने तरुणांमध्ये रोग प्रतिकारशक्ती प्रबळ असते, त्यांना या आजाराचा प्रादुर्भाव जाणवत नाही, व ते लवकरात लवकर यातून बरे होऊ शकतात. परंतू वृध्द नागरिक ज्यांना अगोदरच विविध आजारांनी ग्रासले आहे, त्यांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते आणि त्यांना यातून बाहेर पडणेही अवघड जाते. त्यामुळे सतर्कता बाळगून आपल्या स्वत:च्या जीवासह आपला परिवार, नातेवाईक व समाज यांना आपण वाचवू शकतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात तयार झाली पाहिजे.
सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांबद्दल जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात गैरसमज असतात, मात्र त्याला अपवाद असलेलेही काही जण असतात. डॉक्टरांच्या बरोबरीने आज मोठ्या प्रमाणात परिचारीका देखील या लढ्यात मागे नाहीत. आपले कुटूंब, परिवार यांना सोडून त्या रुग्णांच्या सेवेत अहोरात्र राबत आहेत. संपुर्ण आरोग्य प्रशासन रुग्ण सेवेत असतांना आपण त्यांच्यासाठी घरात का थांबू शकत नाही असा अनुत्तरीत प्रश्न मला नेहमी भेडसावत असतो. बाधीत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमधील असंतोष समजून घेतला पाहिजे. व आरोग्य यंत्रणेतील प्रत्येक सदस्यामध्ये दडलेला परमेश्वर प्रत्येकाने पाहिला पाहिजे. इतिहासातील सर्वात मोठे असे सामाजिक संकट आपल्यासमोर उभे असून याचा सर्वांनी मिळून मुकाबला केल्यास यश नक्कीच मिळेल, यात शंका नाही.
डॉ.पंकज आशिया (भा.प्र.से.)
(घटना व्यवस्थापक तथा इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर प्रमुख,मालेगाव)
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

