पुणे : हरित क्रांतीनंतर शेती व्यवसायात झालेल्या बाजारीकरणाचा फटका दुर्मिळ आणि पोषणमूल्यांनी परिपूर्ण असलेल्या इतर शेती उत्पादनांसह तांदुळाला देखील बसत असून अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. पेटंटच्या बाजारीकरणामुळे तांदुळाच्या दुर्मिळ जातींचे नुकसान होत आहे, अशी खंत मुनीगुडा, ओरिसा येथील अग्रणी पर्यावरणशास्त्रज्ञ आणि यंदाच्या वसुंधरा सन्मानाचे मानकरी डॉ. देबल देब यांनी व्यक्त केली.
१४ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त आज डॉ. देबल देब यांच्याशी विशेष वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुप्रिया चित्राव आणि डॉ. गुरूदास नूलकर उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. देबल देब म्हणाले की, पूर्वी बिया विकत घेऊन शेती करणे हा प्रघातच नव्हता. पंरपरा आणि पिढाजात पद्धतीने बियाण्यांचे वाण हस्तांतरीत होत होते. त्यामुळे पूर्वीच्या काळी उत्पादित होणारे धान्य हे पोषक, सशक्त आणि रोगमुक्त असायचे. पारंपारिक ज्ञानाला बाजारीकरणाने झाकोळून टाकल्याने पारंपारिक ज्ञान हे मागासलेले आहे, असा सरसकट शिक्का मारला गेला.
ते पुढे म्हणाले की, आज शेती व्यापाराशी संबंधित असलेल्या कंपन्यांनी अशा प्रकारची बियाणे उत्पादित केली आहेत की, शेतक-यांना चांगले उत्पादन असल्यास त्यांच्या बियाण्यांशिवाय पर्याय रहात नाही. संशोधनाच्या नावाखाली तांदुळामध्ये जनुकीय बदल झाले असून त्याचे पोषणमूल्य नगण्य झाले आहे. आज कोलकात्यात वसुधा या वैज्ञानिक प्रयोगशाळेव्दारे मी तांदुळाच्या अनेक दुर्मिळ आणि नामशेष होत चाललेल्या जातींचे संवर्धन करीत असून ते संशोधन आणि त्या बिया शेतक-यांना विनामूल्य उपलब्ध करून देत आहे. तांदुळाच्या बाबतीत वैज्ञानिक दस्तऐवजीकरण आवश्यक असून शेतक-यांच्या पारंपारिक ज्ञानाचा आधार घेत, त्या ज्ञानाची मोडतोड करून कंपन्या पेटंट घेऊन गब्बर होत आहेत.
तसेच पारंपारिक ज्ञानाच्या माध्यमातून निर्माण होणारा तांदुळ पोषणमूल्यांच्या अनुषंगाने उजवा ठरतो. परंतु, ज्या गतीने सरकारला जीडीपी वाढवायचा आहे त्या गतीच्या स्पर्धेत तो टिकत नसल्याने शासकीय पातळीवर देखील पारंपारिक तांदुळ उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात नाही. परंपरेने आणि पिढाजीत शेती व्यवसायात आलेल्या सामान्य ज्ञानाला झुगारून सरकार, त्या ”अपरिचीत वैज्ञानिकांचा” अपमान करीत असल्याचा दावाही देबळ यांनी यावेळी केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

