🕒 1 min read
लातूर : कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता आपल्याला लॉकडाऊनचा चौथ्या टप्प्यालाही सामोरे जावे लागणार असल्याचे संकेत लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. तर लातूर आँरेज झोनमधून रेडकडे न जाता लातूर ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले आहे. फेसबुक लाइव्ह द्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला.
लातूरबाबत बोलताना अमित देशमुख ते म्हणाले की, लॉकडाऊन लागू करून ४५ दिवस उलटले आहेत. या सबंध काळात ओढावलेल्या परिस्थितीने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पण मणसाचा जीव महत्वाचा असल्याने हे नियम पाळावे लागत आहेत. जिल्ह्यात २२ कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आँरेज झोनमधून रेडकडे न जाता लातूर ग्रीन झोनमध्ये येण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन देशमुख यांनी केले आहे.
सोशल डिस्टन्स यासारखे नियम आता लादण्यापेक्षा त्याचा स्वत:हून अवलंब करणे ही काळाची गरज झाली आहे. कोरोनाशी लढा देत असताना अर्थचक्रही सुरू होण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळेच उदगीर वगळता इतरत्र उद्योग-व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. याकरिता दिवसही ठरवून दिले आहेत तर ग्रामीण भागात सर्वच उद्योग व्यवसाय सुरू झाल्याने आर्थिक चक्र सुरू झाले आहे.
नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळणेही गरजेचे आहे. ग्रामीण भागात जलसंधारण, रस्ते, विहीरी, शेततळी यासारखी कामे सुरू झाली आहेत. शहरातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय कवचकुंडल म्हणून कार्यरत असलेल्या नर्सेस, पोलीस अधिकारी-कर्मचारी, सफाई कामगार यांच्यावर होणारे हल्ले हे निंदणीय आहेत. यावर राज्य सरकारने कठोर पाऊले उचलली आहेत.


