🕒 1 min read
अजित उंब्रजकर : कोरोनामुळे रखडलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 21 मे रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. संख्याबळानुसार भाजपकडे चार जागा येण्याची शक्यता असून आता सोलापूर जिल्ह्यातून मोहिते-पाटील घराण्याला भाजपकडून न्याय मिळतो का नाही याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 27 मे पूर्वी विधिमंडळाच्या दोन्ही पैकी एका सभागृहाचे सदस्य होणे अपेक्षित असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारवरील अनिश्चितता संपली आहे. या नऊ जागांसाठी 29 मतांचा कोटा आहे. भाजपकडे मित्र पक्षासह 115 आमदार असल्याने त्यांचे चार आमदार निवडून येऊ शकतात. महाआघाडीचे 173 आमदार असल्याने त्यांचे पाच आमदार निवडून येतील.
भाजपकडे अनेक दिग्गज नेते विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत. त्यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे या जुन्या नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय काही अटी आणि शर्ती ठेवून पक्षात आलेल्या नेत्यांचाही भाजपला विचार करावा लागणार आहे. यामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील म्हणजे पाटील परिवाराचा समावेश आहे. मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या ताकदीच्या जोरावर भाजपने माढा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करून दणदणीत विजय मिळवला होता.
याशिवाय आत्तापर्यंत राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला माळशिरस विधानसभा मतदारसंघही मोहिते पाटला मुळेच यंदा भाजपकडे आला आहे. याशिवाय जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीही मोहिते पाटील यांच्या रूपाने भाजपकडे आहेत. ग्रामीण भागात मोहिते-पाटील यांची प्रचंड ताकद आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा मोहिते-पाटील यांचे पुनर्वसन करायचे आहे असे अनेकदा बोलून दाखवलेले आहे.
दरम्यान,आता विधान परिषद निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे मोहिते-पाटील कुटुंबातील रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपकडून विधान परिषदेवर संधी मिळणार का, अशी चर्चा आता सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
