अभिनेत्री केतकी चितळेला ट्रोल करणाऱ्यांपैकी गोरेगाव पोलिसांनी औरंगाबादमधून एकाला अटक केली आहे. अश्लील आणि शिवीगाळ करून केतकीला ट्रोल करण्यात आले होते. त्या प्रकरणी ट्रोल करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी फिल्डिंग लावली आहे.
‘तुझं माझं ब्रेक अप’ या मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली केतकी चितळे हिने सोशल मीडियावर हिंदी भाषेत एक व्हिडीओ अपलोड केला होता. मराठी अभिनेत्री असतानाही हिंदीमध्ये व्हिडिओ अपलोड करणाऱ्या केतकीवर अनेकांनी टिका केली. एक हजारांहून अनेकांनी केतकीला ट्रोल केले. यामध्ये काहींनी अश्लील, शिवीगाळ करत खालच्या स्तरातील भाषा वापरली. यामुळे संतापलेल्या केतकीने ट्रोलकऱ्यांना त्याच शब्दांत प्रत्युत्तर दिले. एक व्हिडिओ पुन्हा अपलोड करून प्रत्येकाचा समाचार घेतला.
केतकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ट्रोल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. फडणवीस यांच्या आदेशानंतर गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या प्रकरणी मनसेचे राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती.
गोरेगाव पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहून केतकीला ट्रोल करणाऱ्यांची कुंडली काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक पुराव्यावरून शेकडो ट्रोलकरांमधील एकजण औरंगाबाद येथील असल्याचे समजले. औरंगाबाद येथे क्रेन ऑपरेटर म्हणून काम करणाऱ्या सतीश पाटील याला पोलिसांनी अटक केली. इतरांची देखील माहिती काढण्यात येत असून त्यांनाही या प्रकरणात अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

