🕒 1 min read
मुंबई : माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरुध्द समाजमाध्यमांमध्ये असंसदीय शब्दात टिका करणारे तसेच धमकी देणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करावी. तसेच पोलिसांवरील भ्याड हल्ले रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्णयानुसार कोव्हीड-१९ योध्दांवर हल्ला झाल्यास त्यांच्याविरुध्द अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची मान्यता दिली आहे. या कायद्याचा वापर करून पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर गुन्हा दाखल करावा व पोलीस दलाचे मनोबल वाढवावे अशी मागणी आज भाजपाच्या शिष्टमंडळाच्यावतीने मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्याकडे करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, खासदार गोपाळ शेट्टी, भाजप मुंबईचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. ही मागणी करण्यापूर्वी त्यांनी ‘आघाडी बिघाडी’, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी. अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
तर, आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टीका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टीका थांबवणे ही जीवनावश्यक सेवा आहे का ? असा सवाल देखील जयंत पाटील यांनी भाजपला विचारला आहे.
दरम्यान, गेली पाच वर्ष आम्ही विरोधी पक्षात असताना, अत्यंत अश्लील टीका एका विशिष्ट गटाकडून आमच्यावर होत होती, त्यावेळी आमच्या तक्रारी सुद्धा पोलीस नोंदवून घेत नव्हते. आज जनता भाजपा नेत्यांवर रचनात्मक टीका करत आहे, तर ती भाजपा नेत्यांना सहन होत नाहिये. भाजपाने रडीचा डाव खेळू नये. आज जागतिक हास्य दिन आहे. माझ्याकडून जागतिक हास्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. हसत रहा, हसवत रहा. असा उपरोधिक टोला देखील जयंत पाटील यांनी भाजपला लावला आहे.


