🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात मधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार आहे. एकाच ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय कारभार करणे सोपे होईल यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. यावर आता राज्यातील काही नेत्यांनी आक्षेप घेतला आहे.
याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. ‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तिला एक वेगळे महत्त्व आहे. मात्र गेल्या २०१४ पासून भाजपने मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव आखला आहे,’ अशा शब्दात पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.
याबाबत पुढे ते म्हणतात, ‘IFSC बाबतचा निर्णय केंद्राने घेतला आहे. जेव्हा ही प्रक्रिया सुरू होती तेव्हा आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेर याचा विरोध केला पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर भाष्य केले नाही,’ असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. असं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.
दरम्यान, भाजप महाराष्ट्राची आर्थिक व्यवस्था कमकुवत करून गुजरातची आर्थिक व्यवस्था चांगली करण्याचा प्रयत्न करत आहे. हे आता जनतेने जाणले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी भाजपवर आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.


