🕒 1 min read
नागपूर : चांदमारी-बिडगाव-वाठोडा घाट रस्त्यासाठी ९.७५ कोटी रुपये निधी शासनाकडून प्राप्त झाला अन् नवीन रस्त्याच्या बांधकामाला जिल्हाधिकारी व माजी मनपा आयुक्तांची मंजुरीही दिली. पुढे निविदा निघाल्या आणि बांधकामाला सुरुवात होणार तेवढ्यात मनपाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे आले. मग काय सुरू असलेल्या विकासकामे रोखण्याचे जणु सत्रच सुरू झाले.
संघर्षनगर, डंपिंग यार्ड समोरील रस्त्यासाठी ८ कोटी रुपयांच्या कामाचा निधी प्राप्त झाला होता. स्थायी समितीची मान्यता अन् माजी मनपा आयुक्तांची मंजुरीही मिळाली पण त्यानंतर आयुक्तपदी आलेल्या मुंढेंनी निविदेच्या कार्यादेशावर स्वाक्षरी देण्यास नकार दिला. त्यामुळे रस्त्याचे काम बारगळले.
सध्या पावसाळा सुरू असल्याने हे दोन्ही रस्ते बनून तयार होणे अत्यंत आवश्यक होते. नागरिकांच्या वारंवार मागणीवरून शासनाकडून निधी मिळण्याकरिता केलेला संघर्ष मुंढेंच्या आदेशामुळे उपयोगी आला नसल्याची खंत आमदार कृष्णा खोपडे यानी व्यक्त केली आहे.
निधी मिळाल्यानंतर प्रशाकीय मान्यता व अन्य सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विकासकामाच्या प्रती उदासीनता दाखवित मुंढे यांनी हे काम कोणाच्या इशार्यावर थांबविले हेच कळत नाही. या मार्गाने दररोज ८00 ट्रक डंपिंग यार्डमध्ये येतात. तसेच टँकरचे आवागमन देखील या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे हा सिमेंट रोड होणे अत्यंत आवश्यक होते. मात्र, विनाकारण काम थांबविल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. आता मुंढे नाही त्यामुळे थांबविलेली विकासकामे तातडीने सुरू करा, अशी मागणी आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे.
पूर्व नागपुरातील १८ कोटींच्या वरील दोन कामासह तब्बल ३२.४३ कोटींची विकासकामे मनपा आयुक्तांनी थांबविलेली आहे. या विकासकामापैकी ११ विकासकामे शासकीय निधीतून असून १ विकासकार्य मनपाच्या निधीतून मंजूर झाले आहे. या संपूर्ण विकासकामाला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तत्कालीन मनपा आयुक्त व शासनाने मंजुरी प्रदान केली असून कुणाच्या तरी इशार्यावर मनपा आयुक्तांनी ही कामे थांबविली असल्याचा आरोप आमदार कृष्णा खोपडे यांनी केलेला आहे.
महाविकास आघाडीमध्ये धुसफूस वाढली ; परभणीत शिवसेनेनेच फोडले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय
विराट कोहलीच्या घरी हलणार पाळणा; चाहत्यांची अखेर ‘ती’ प्रतीक्षा संपली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

