मुंबई : महेंद्रसिंह धोनीने काल गुरुवारी चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. रवींद्र जडेजा चेन्नईचा नवा कर्णधार बनला आहे. धोनी आयपीएलमध्ये खेळाडू म्हणून खेळत राहणार आहे. ही माहिती समोर आल्यानंतर क्रिकेट जगतातील तमाम दिग्गज खेळाडू प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही धोनीबाबत मत दिले.
धोनीला शुभेच्छा देण्यासाठी कोहलीने धोनीसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. “पिवळ्या जर्सीमध्ये दिग्गज कर्णधारपदाचा कार्यकाळ. एक अध्याय चाहते कधीही विसरणार नाहीत. नेहमी आदर केला जाईल”, असे कोहलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४७४६ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याला आयपीएलमध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही, मात्र त्याने २३ अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद ८४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत २१९ षटकार मारले असून ३२५ चौकार मारले आहेत. विशेष बाब म्हणजे धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ चारवेळा आयपीएल चॅम्पियन बनला आहे, तर आठवेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याशिवाय धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ विक्रमी ११ वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला.
यंदाचा आयपीएल हंगाम २६ मार्चपासून सुरू होणार असून पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
- आवडता नेता कोण विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या; “घर की मुर्गी…”
- केंद्राने हटवलेले निर्बंध हे दुसरे स्वातंत्र्यच आहे- संजय राऊत
- आमदारांना 300 घरं देणार, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत मोठी घोषणा
- “… तर आम्ही ही कमी पडणार नाही”- ओमराजे निंबाळकर
- वनविभागातर्फे सुरू असलेल्या गॅबियन बंधाऱ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार – निलेश लंके

