पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोचे उद्घाटन झाले. त्याचबरोबर मोदींनी इतर काही विकासकामांचे उदघाटनही केले. यावेळी जनतेशी संवाद साधताना मोदी म्हणाले कि, पुणे मेट्रोच्या भूमीपूजनाला तुम्ही मला बोलावलं होतं आणि आता मेट्रोच्या लोकार्पणाचीही तुम्ही मला संधी दिली. हे माझं सौभाग्य आहे. तसेच वेळेवर प्रकल्प पूर्ण केले जाऊ शकतात हे याचं उदाहरण आहे. पूर्वी फक्त भूमीपूजन व्हायचं, पण लोकार्पण होणार याची शाश्वती नसायची, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.
पंतप्रधान मोदी यांचे सकाळी पुणे महापालिकेत आगमन झाले. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आसनारुढ भव्य पुतळ्याचं अनावरण केले आणि महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीत करत पुण्यातील समाजसुधारक आणि क्रांतीकारकांना अभिवादन देखील केले. पुणेकरांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आमचे सरकार अनेक आघाड्यांवर काम करत आहे, असेही मोदी म्हणाले.
मोदींच्या पुणे दौऱ्यासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार उदयनराजे भोसले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.
रामभाऊ म्हाळगींचें स्मरण
मोदींनी त्यांच्या भाषणादरम्यान रामभाऊ म्हाळगींचें स्मरण केले. यावेळी मोदी म्हणाले, आज महाराष्ट्राच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करणाऱ्या रामभाऊ म्हाळगी यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या कार्यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. पुण्याच्या पावनभूमीत राहिलेल्या बाबासाहेब पुरंदरेंचेही मी आज आदरपूर्वक स्मरण करतो. काही वेळापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचं लोकार्पण केले आहे. आपल्या सर्वांच्या मनात असलेली छत्रपतींची प्रतिमा येत्या प्रत्येक पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागृत करेल, असेही मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

