मुंबई: उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकामुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलेच तापताना दिसून येत आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी आपले प्रयत्न पणाला लावले आहे.सध्या गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी कॉंग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे. गोव्यात कॉंग्रेसला ४० पैकी ४५ जागा मिळतील. असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
‘काँग्रेसचं माहीत नाही, पण शिवसेना आणि एनसीपी गोव्यात एकत्र आहेत. काँग्रेससाठी आम्ही प्रयत्न केला. त्यांच्यासोबत चर्चा केली. पण त्यांना असं वाटतं ४० पैकी ४५ जागा मिळतील. पैकीच्या पैकी जागा त्यांना गोव्यात मिळू शकतात असं त्यांना वाटतं. इतका आत्मविश्वास एखाद्या पक्षाला असेल तर आपण त्यांच्या आत्मविश्वासाला कशाला तडा द्यायचा? अशा शब्दांत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी माझी चर्चा झाली. स्थानिक स्तरावरही चर्चा झाली. दिगंबर कामत, दिनेश गुंडूराव, गिरीश तोडणकर यांच्याशी चर्चा केली. त्यांचा सकारात्मक सूर असला तरी जागा वाटपाच्यावेळी त्यांच्या अडचणी येतात. आम्हाला दोन-तीन जागा देण्याचा प्रस्ताव त्यांनी नक्कीच ठेवला होता. आमची चर्चा झालीच नाही. चर्चेतून काहीच निष्पन्न झालं नाही असं मी म्हणणार नाही. चर्चा झाली. आम्हाला त्यांनी काही जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आमच्यासोबत राष्ट्रवादीही आहे. त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. महाविकास आघाडी जेव्हा आपण बोलतो तेव्हा केवळ शिवसेना राहत नाही. राष्ट्रवादी आहे. त्यांना कोणत्या जागा हव्यात, ते कोणत्या जागांवर लढू इच्छितात यावर चर्चा होणं गरजेचं आहे ती होऊ शकली नाही. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसला शुभेच्छा दिल्या. असा चिमटाही संजय राऊत यांनी काढला आहे.
दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी मोठा दावाही केला आहे. गोव्यात आम्ही १२ ते १५ जागांवर लढणार आहोत. आमची यादी तयार आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आल्यावर आम्ही यादी फायनल करू. पटेल सध्या गोंदिया भंडाऱ्याच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. ते आल्यावर निर्णय घेऊ. आदित्य ठाकरेंनी एक टीम गोव्यात पाठवली आहे. आदित्यच्या नेतृत्वात प्रमुख नेत्यांची बैठक झाली. आम्ही ज्या जागा लढवत आहोत. त्यातील काही जागांवर लक्ष देऊ. असेही राऊत यांनी म्हटले आहे. तसेच काँग्रेस गोव्यातील मोठा पक्ष आहे. मात्र राष्ट्रवादीला हव्या असलेल्या जागा काँग्रेस सोडायला नाही. मागील निवडणुकीत त्यांना १७ जागा मिळाल्या होत्या. सध्या काँग्रेसकडे २ ते ३ आमदार आहेत. आम्ही कॉंग्रेसला ३० जागा तर बाकी १० जागा शिवसेना, राष्ट्रवादीला देण्यासाठी म्हटले होते. पण त्यांना त्याही जागा द्यायच्या नसतील तर त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त उमेदवार एका मतदारसंघात असतील तर त्यांची अडचण समजू शकतो. असेही ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- मालिकेतून बाहेर काढल्यानंतर अभिनेता किरण माने घेणार शरद पवारांची भेट?
- “धर्माच्या नावाखाली चालणारे भाजपचे राजकारण लोकांनी नाकारले”, नवाब मलिकांचे टीकास्त्र
- औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा!
- औरंगाबादकरांसाठी सुखावह बातमी; लवकरच होणार खाम नदीचे लोकार्पण!
- पुण्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात वाढले १० हजाराहून अधिक रुग्ण


